सर्वच संवर्गातील ३१.६३ टक्के पदे रिक्त; निवड यादी जाहीर होत नसल्याने रोष

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : मुंबईचा काही भाग वगळून वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणमध्ये सर्व संवर्गातील ३१.६३ टक्के पदे रिक्त आहेत. वर्ग १ (१३.७३ टक्के) आणि वर्ग दोन (११.०१ टक्के) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या तुलनेत वर्ग ३ (३३.२९ टक्के) आणि वर्ग ४ (३४.२५ टक्के) संवर्गातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे अधिक आहेत. जुलै- २०१९ मध्ये महावितरणने विद्युत साहाय्यक आणि उपकेंद्र साहाय्यकांची ७ हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण केली. परंतु निवड यादी जाहीर होत नसल्याने बेरोजगारांमध्ये रोष आहे.

राज्यातील २.६६ कोटी ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणमध्ये २८ मे २०२० च्या स्थितीनुसार वर्ग १ पासून सगळ्याच संवर्गातील ८१ हजार ६२७ पदे मंजूर असून त्यातील २५ हजार ८१८ पदे रिक्त आहेत. वर्ग एकच्या १,६७६ पदांपैकी १,४४६ पदे (८६.२७ टक्के) भरलेली, तर २३० पदे रिक्त आहेत. वर्ग दोन संवर्गातील ६,४३३ पदांपैकी ५,७२५ पदे भरलेली (८८.९९ टक्के) तर ७०८ पदे रिक्त आहेत. वर्ग तीन संवर्गातील ३०,८६९ पदे मंजूर असून त्यातील २०,५९५ पदे (६६.७१ टक्के) भरलेली, तर १०,२४७ पदे रिक्त आहेत. वर्ग चारची ४२,६४९ पदे मंजूर असून त्यातील २८,०४३ पदे भरलेली (६५.७५ टक्के), तर १४,६०६ पदे रिक्त आहेत.

यंत्रचालक संवर्गातील राज्यात १४,८७० पदे मंजूर आहे. पैकी ८,९७५ भरलेली, तर ५,८९५ पदे रिक्त आहेत. तंत्रज्ञ संवर्गातील २८,५२६ पदे मंजूर असून त्यातील १५,२७१ पदे भरलेली, तर १३,२५५ पदे रिक्त आहेत. अतांत्रिक संवर्गातील ४,४५७ पदे मंजूर असून त्यात ३,८५९ पदे भरलेली, तर ५९८ पदे रिक्त आहेत. सन २०१८ मध्ये महावितरणने वर्ग १ आणि २ संवर्गातील ६१४ उमेदवारांची नियुक्ती केली. तर सन २०१९ मध्ये ३८५ अभियंत्यांची निवड प्रक्रिया होऊन त्यांना नियुक्ती दिली जात आहे. जुलै- २०१९ मध्ये महावितरणने विद्युत साहाय्यकांची ५,००० आणि उपकेंद्र साहाय्यकांची २,००० पदे भरण्याची जाहिरात काढली. त्यानुसार विद्युत साहाय्यक पदासाठी १,०८७६६ तर उपकेंद्र  साहाय्यक पदासाठी ३२,९८३ उमेदवारांनी अर्ज केले. या उमेदवारांची २५ ऑगस्ट २०१९ मध्ये लेखी परीक्षा झाली. या प्रक्रियेसाठी महावितरणने आय.बी.पी.एस. कंपनीला ४ कोटी ८४ लाख रुपये दिले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही महावितरणकडून निवड यादी जाहीर झालेली नाही.

यापूर्वी २,५०० पदांची प्रक्रिया रद्द

महावितरणने काही वर्षांपूर्वी २,५०० उपकेंद्र सहाय्यक पदाची जाहिरात काढली होती. त्यासाठी हजारो उमेदवारांनी विशिष्ट शुल्क भरून अर्ज सादर केले. परंतु महावितरणने परीक्षा न घेताच ही प्रक्रिया रद्द केली.  उमेदवारांना पैसेही परत करण्यात आले नाही. यंदाही महावितरणकडून विद्युत साहाय्यक आणि उपकेंद्र साहाय्यकांच्या ७,००० पदांची यादी जाहीर करण्याबाबत काहीही प्रक्रिया होताना दिसत नाही. ही पदे भरल्यावरही महावितरणकडे १८,००० पदे रिक्त राहणार असून ती तातडीने भरण्याची गरज असून  या विषयावर ऊर्जामंत्र्यांना निवेदनही दिल्याचे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेरडेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी सांगितले.

महावितरणकडून वेळोवेळी गरजेनुसार पदे भरली जातात. यंदा टाळेबंदीसह इतर कारणांनी विद्युत साहाय्यकांसह उपकेंद्र साहाय्यकांच्या सात हजार पदांच्या भरतीबाबत थोडा विलंब झाला. परंतु प्रशासनाकडून लवकरच नियमानुसार कारवाई केली जाईल.

– अनिल कांबळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई.