* स्वयंचलित यंत्रणेद्वारे देणार नातेवाईकांना संदेश * ऑटोरिक्षा, टॅक्सीसह इतर वाहनांच्या तक्रारीचीही सोय

राज्य परिवहन विभागाने नवीन मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे. आपत्कालीन स्थितीत या अ‍ॅपच्या माध्यमातून संबंधित नातेवाईकांसह पोलीस व इतर यंत्रणांना संदेश पोहोचवण्याची सुविधा आहे. नियम मोडणारे ऑटोरिक्षा, टॅक्सी व इतर वाहनांच्या तक्रारी करण्याचाही पर्याय या अ‍ॅपवर देण्यात आला आहे.

शहरात ऑटोरिक्षा, टॅक्सीसह इतर व्यावसायिक परवानाप्राप्त वाहनांद्वारे वाहतूक सुविधा दिली जाते. ग्रामीणच्या तुलनेत शहरी भागात ही वाहने जास्त आहेत. काही नागरिकांची अडचण हेरून ऑटोरिक्षा व टॅक्सीचालक प्रवाशांकडून जादा भाडे आकारून लूट करतात. एकाकी महिलांना त्रास देतात. राज्यातील काही भागात एकटय़ा महिला प्रवासीवर अत्याचाराच्याही घटना पुढे आल्या आहेत.

आपात्कालीन स्थितीत अडकलेल्या प्रवाशांना पूर्वी कोणत्याही मदतीची व्यवस्था नव्हती. परिवहन विभागाने महा-ऑनलाईनच्या मदतीने एक अ‍ॅप विकसित केले आहे. प्रवाशांनी हा अ‍ॅप मोबाईलवर डाऊनलोड केल्यास व त्यात जवळच्या काही नातेवाईकांचे मोबाईल क्रमांक अपलोड केल्यास आपत्कालीन वेळेत अ‍ॅपवर विशिष्ट ठिकाणी स्पर्श करताच स्वयंचलित पद्धतीने जवळच्या नातेवाईकांसह पोलीस यंत्रणेला संदेश जाईल. त्यामुळे या व्यक्तीला वेळीच मदत उपलब्ध होईल.

अपघात झाल्यास रुग्णवाहिकेची तसेच पोलिसांची मदत संबंधितांना मिळेल.

अ‍ॅपमध्ये मीटरने न चालणाऱ्या ऑटोरिक्षा, टॅक्सीसह नियम मोडणाऱ्या सर्वच वाहनांच्या तक्रारी करण्याचाही पर्याय आहे, असे नागपूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) शरद जिचकार यांनी सांगितले.

अ‍ॅप सामान्यांकरिता सोयींचे

परिवहन विभागाचा मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. स्मार्ट फोनधारकांना आरटीओ महाराष्ट्र नावाने हा अ‍ॅप डाऊनलोड करता येतो. अ‍ॅपमुळे क्षणात मदतीचा संदेश नातेवाईकांसह पोलिसांना मिळणार असल्यामुळे तो सामान्यांकरिता सोयीचा ठरणारा आहे.

– श्रीपाद वाडेकर,

प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (ग्रामीण)