संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटो यांचे परखड मत; विदर्भ साहित्य संघातर्फे सत्कार

मुंबईतील आरेमध्ये एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर झाडे कापली गेली. परंतु एकाही साहित्यिकाचा आवाज आला नाही. समाजहिताच्या विषयावर साहित्यिकाने भूमिका घेतली पाहिजे.  साहित्यिक अशी भूमिका घेत नसतील तर तो त्यांचा कचखाऊपणा आहे, असे परखड मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केले.

उस्मानाबाद येथे आयोजित आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विदर्भ साहित्य संघाच्यावतीने आज मंगळवारी त्यांचा मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. फादर दिब्रिटो म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी होत आहे, तो दर्जा अजूनपर्यंत मिळाला नाही. कारण आपण अभिजात वागतच नाही. साहित्यिक याबाबत कमी पडत आहेत. विचारांचे मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण झाले आहे. ते आता प्राणवायू देऊ शकत नाही. शासनालाही माहिती आहे, लाचार होऊन शेवटी ते आमच्याकडेच येणार. त्यामुळे साहित्यिकाने भूमिका घ्यावी आणि संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे. लोकशाहीत प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे आणि ते कायद्याच्या चौकटीत राहून हवे. त्याला हिंसक वळण लागू नये. माझा समाज धर्म हिंदू आहे आणि साधना धर्म ख्रिस्ती. मी बायबल मराठीतूनच वाचले आहे. माझ्यावर टीका होते, तेव्हा मी कुणाला दोष देत नाही  तर आत्मचिंतन करतो.  आम्ही आदिवासींना लुटले आहे. नागपुरात फिरताना आज गोवारींचे स्मारक दिसले. मोठय़ा प्रमाणावर गोवारी शहीद झाले आणि हे म्हणजे दुसरे जालीयनवाला बाग हत्याकांडच होते. असेही दिब्रिटो म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले. यावेळी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, कार्याध्यक्ष वामन तेलंग व साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दीक्षाभूमीला भेट

विदर्भ साहित्य संघातर्फे आयोजित  सत्कार सोहोळ्यासाठी नागपुरात आले असता फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी दीक्षाभूमीला आवर्जून भेट दिली.