News Flash

मुंबै बँक कर्ज घोटाळ्याचे खापर अधिकाऱ्यांच्या माथी

दोन शाखा व्यवस्थापक निलंबित; संचालकांचे नातेवाईक नामानिराळे

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

दोन शाखा व्यवस्थापक निलंबित; संचालकांचे नातेवाईक नामानिराळे

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (मुंबै बँक) बहुचर्चित कर्ज घोटाळ्याचे खापर अधिकाऱ्यांच्या माथी फोडण्यात आले असून, या प्रकरणात दोन शाखा व्यवस्थापकांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या घोटाळ्याची खातेनिहाय चौकशी सुरू असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी विधानसभेत दिली. मात्र या गैरव्यवहाराचा केंद्रबिंदू असलेले संचालकांचे नातेवाईक नामानिराळेच राहिले.

मुंबै बँकेतील काही पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी बँकेच्या कर्ज योजनेतून अनेक सभासदांच्या नावावर परस्पर कर्ज प्रकरणे मंजूर करून कोटय़वधी रुपयांची अफरातफर केल्याचे प्रकरण ‘लोकसत्ता’ने (३१ ऑक्टोबर) उघडकीस आणले होते. बँकेतील पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद आणि अधिकाऱ्यांशी हातमिळवणी यांच्या माध्यमातून अनेक बनावट कर्जप्रकरणे करून कर्जदारांच्या खात्यावरील रक्कम परस्पर आपल्या नावावर वळती करून घेण्याचा तसेच पात्र नसलेल्या कर्मचाऱ्यांना बेकायदा कर्ज मंजुरी दिल्याचे बँकेच्या दक्षता पथकाने केलेल्या चौकशीत आढळून आल्याचेही ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणले होते. महेश पालांडे हे बँकेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याचे नातेवाईक असून १२ कर्ज प्रकरणात खातेदारांच्या खात्यातून पालांडे यांच्या अशोकवन शाखेतील खात्यावर (क्र. ५१/१०/०१/४९२) तब्बल १२ लाख २० हजार रुपये जमा करण्यात आले. मात्र पालांडे यांच्या खात्यातून कर्जदारांच्या खात्यावर केवळ एक लाख १२ हजार ४०० रुपये वळविण्यात आले. अन्य एका प्रकरणात कर्जदाराच्या खात्यावरून अमोल खरात यांच्या अशोकवन शाखेतील खात्यात (खाते क्र. ५१/१०/०१/१०) २.४० लाख रुपये जमा करण्यात आले तर खरात यांच्या खात्यातून केवळ अनिरुद्ध रईजादे या कर्जधारकाच्या खात्यावर १० हजार रुपये जमा करण्यात आले. याच प्रकारे राजेंद्र घोसाळे यांच्या ठाकूर व्हिलेज कांदिवली येथील खात्यावर (क्र. ४९/१०/०१/१७९५) कर्ज खातेदारांच्या खात्यातून दोन लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे बँकेच्या सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेले ठाकूर व्हिलेज कांदिवली शाखेचे व्यवस्थापक सी. ए. खानविलकर यांच्या खात्यावर (क्र. १६/१३/१०/१५३) अमोल खरात यांच्या अशोकवन शाखेतील खात्यातून (क्र. ५१/१०/१/१०) सव्वा लाख रुपये जमा झाल्याचे दक्षता पथकाच्या चौकशीतून समोर आले होते.

विधानसभेत बुधवारी प्रश्नोत्तराच्या तासाला नसीम खान, अमिन पटेल (काँग्रेस), संजय सावकरे (भाजप), अजय चौधरी आणि प्रकाश सुर्वे (शिवसेना) आदी सदस्यांनी या घोटाळ्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर दक्षता पथकाने केलेल्या चौकशीत बँक पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले नसल्याचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तर पाच लाखांपर्यंतच्या कर्ज मंजुरीचे अधिकार शाखा व्यवस्थापकांना देण्यात आले असून त्यात संचालक मंडळाने हस्तक्षेप केलेला नाही. काही कर्ज प्रकरणात तांत्रिक अनियमितता आढळल्या असून या अनियमिततेप्रकरणी बँकेच्या दोन शाखा व्यवस्थापकांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी खातेनिहाय चौकशी सुरू असल्याचे सहकारमंत्री देशमुख यांनी सांगितले. या बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्याचे प्रशस्तिपत्रकही मंत्र्यांनी या वेळी दिले.

त्यावर बँकेत अनियमितता झाली आहे पण भ्रष्टाचार नाही असे मंत्री सांगत आहेत. मग भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार यातील फरक  काय हे मंत्र्यांनी स्पष्ट करावे. वरिष्ठांच्या आशीर्वादाशिवाय कनिष्ठ अधिकारी असा घोटाळा करू शकत नाहीत त्यामुळे कोणाच्या आशीर्वादाने हा घोटाळा झाला आहे याची चौकशी करावी आणि निलंबित अधिकारी तसेच महेश पालांडे, राजेंद्र घोसाळे आणि अमोल खरात यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी हरीश पिंपळे, संजय सुर्वे आणि संजय सावकारे यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 1:47 am

Web Title: mumbai district central co operative bank financial scam part 4
Next Stories
1 विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांची कोंडी
2 विद्यार्थिनीला शिक्षा करणाऱ्या मुख्याध्यापिकेचे वेतन रोखले
3 आशीष देशमुखांची विरोधकांना साथ
Just Now!
X