पत्नी आपले ऐकत नाही, स्वयंपाक करीत नाही, तर दररोज हॉटेलमध्ये खाण्याचा आग्रह धरते. कार्यालयातून परतल्यावर पेलाभर पाणी देत नाही आणि आपल्याशी क्रुरपणे वागते. याशिवाय, तिच्या गर्भातील बाळ आपले नाही, हे आरोप पती सिद्ध करू शकत नसल्यास तीच कारणे पतीचे घर सोडण्यासाठी महिलेला पुरेशी आहेत, असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.

गोंदिया येथील नरेंद्र आणि नागपुरातील बबिता (दोघांचीही नावे बदललेली) यांचा ११ जून १९९९ ला विवाह झाला. त्यानंतर काही दिवसांनीच बबिता गर्भवती झाली. त्यावेळी आरोपीने तिच्या पोटातील बाळ आपले नसल्याचा आरोप करून गर्भपात करण्यास सांगितले. तिने नरेंद्रचे न ऐकता ८ सप्टेंबर १९९९ ला पतीचे घर सोडले. त्यानंतर नवऱ्याने पत्नीला अनेक नोटीस पाठविल्या. ती न परतल्याने त्याने पत्नीने नांदायला यावे म्हणून कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला.

त्यावेळी त्याने सांगितले की, पत्नी स्वयंपाक करीत नाही आणि हॉटेलमध्ये खाण्याचा आग्रह धरते. ती नवऱ्याचे ऐकत नाही. कार्यालयातून परतल्यावर पेलाभर पिण्याचे पाणी देत नाही आणि क्रुर वागणूक देते, असे आरोप केले, तर पत्नीने नरेंद्र हा माहेरून हुंडा घेऊन आणण्याकरिता छळ करतो. तिच्या पोटातील बाळ आपले नसून गर्भपात करण्याचा आग्रह तो धरतो. अशा पतीसोबत आपण संसार करू शकत नाही, असे आरोप करून पत्नीने ते सिद्धही केले. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाने नरेंद्रचा अर्ज फेटाळला. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात अपील केले. त्यावर न्या. वासंती नाईक आणि न्या. विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

पतीची याचिका फेटाळली

न्यायालयाने सर्व पक्षांची बाजू ऐकल्यावर महिलेने पतीविरुद्ध आरोप सिद्ध केले आहेत, तर पत्नीवर केलेले आरोप पती सिद्ध करू शकला नाही. त्यामुळे पत्नीकडे नवऱ्याचे घर सोडण्यासाठी पुरेसे कारण असल्याचा निर्वाळा देऊन, कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय योग्य ठरविला आणि पतीची घटस्फोट मंजूर करण्याची याचिका फेटाळली.