७१० किमीच्या अतिद्रुतगती मार्गाची आखणी निश्चित; दोन्ही शहरांतील अंतर ९० किमीने घटणार
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई- नागपूर अतिद्रुतगती मार्गाची सरळ आखणी (अलाइनमेन्ट) निश्चित करण्यात आली असून त्याची लांबी ७१० किमी एवढी असेल. त्यामुळे मुंबई-नागपूर हे अंतर अवघ्या आठ तासांत पार करता येणार आहे. नागपूर आणि मुंबई या शहरांना जोडण्यासाठी सध्या तीन मार्ग उपलब्ध आहेत.
औद्योगिक प्रगतीत मागे पडलेल्या विदर्भ-मराठवाडय़ाच्या विकासाला गती देण्यासाठी ‘सुपर एक्सप्रेस वे’ची संकल्पना मांडण्यात आली आहे. या मार्गाला ‘कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेस हायवे’ असे संबोधले जाणार आहे. वाहने १५० किमी प्रतितास वेगाने धावू शकतील अशा पद्धतीने अतिद्रुतगती मार्गाची बांधणी केली जाणार आहे. वळणविरहित असलेल्या या मार्गासाठी डोंगरही फोडले जाणार आहेत. अतिद्रुतगती मार्गावर येण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी २४ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून प्रत्येकी ३० किमी अंतरावर ही ठिकाणे असतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी ३० हजार कोटींची गुंतवणूक आवश्यक आहे.