विदर्भात नोकरी करण्यासाठी अधिकारी तयार नसतात, ही बाब खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे कबूल केली. त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी मुंबई, पुणे येथील अनेक सनदी अधिकाऱ्यांची विदर्भात बदली केली. मुख्यमंत्रीच नागपूरचे असल्याने नाईलाजास्तव त्यांना रुजू व्हावे लागले. तर काही मुजोर अधिकाऱ्यांनी रूजू न होताच परस्पर बदली रद्द करून घेतली. मुख्यमंत्र्यांच्या दंडुक्यानंतर नागपुरात रुजू झालेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांची येथे काम करण्याची मनस्थिती नसून वारंवार वेगवेगळया सुटय़ा टाकत असल्याने ते नागपूर पोलीस आयुक्तालयासाठी डोकेदुखी ठरत असल्याची बाब समोर आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्व प्रथम विदर्भातील रिक्त पदांवर अधिकारी देण्याचे काम सुरू केले. अशात मुख्यमंत्र्यांकडेच गृहखाते असल्याने त्यांनी सर्वप्रथम गृहशहर असलेल्या नागपुरातील पोलिसिंग सुधारण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, अनेक उपायुक्त आणि पोलीस निरीक्षकांच्या नागपुरात बदल्या केल्या. पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त आणि उपायुक्तांची फळी नागपूरला चांगली मिळाली. परंतु शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची खरी जबाबदारी पेलणाऱ्या पोलीस ठाण्यांची घडी अजूनही विस्कटलेलीच आहे. नागपुरातील निम्म्या पोलीस ठाण्यांमध्ये मुंबई, पुणे आणि नाशिक येथून आलेले अधिकारी आहेत. काहींनी परिस्थितीशी जुळवून घेत कामाला सुरुवात केली. त्यांच्या कामाचे आलेखही उंचावले आहे. परंतु काहीजण अद्याप मुंबई, पुणे येथील स्थितीतून बाहेर पडलेले नाहीत.

अनेक अधिकारी वारंवार किरकोळ रजा, वैद्यकीय रजा घेत आहेत. रूजू होऊन पाच ते सहा महिन्यांचा काळही पूर्ण न करता हे अधिकारी राजकीय दबाव टाकून बदली करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पूर्वीच कमी मनुष्यबळात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पेलणारे नागपूर पोलीस दल मुंबई, पुणेकर अधिकाऱ्यांच्या अशा अडेलतट्ट वर्तणुकीमुळे फार अडचणीत आले आहे. यात प्रामुख्याने इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. पी. तावडे आणि सीताबर्डीचे दुय्यम पोलीस निरीक्षक एस. एन. शिंदे यांची नावे प्रामुख्याने घेतली जात आहेत. या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यातील इतर अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे अनेकदा तक्रारही केल्याची माहिती आहे. या व्यतिरिक्त इतर पोलीस ठाण्यातही असाच प्रकार सुरू आहे. त्यामुळे गुन्हे तपास, बंदोबस्त, पॅट्रोलिंग, रात्रीपाळी आदी जबाबदाऱ्या बजावताना इतर अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. या बाबींवर पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव हे लक्ष घालतील का, असा उद्विग्न सवाल पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी एकमेकांना करीत आहेत.

 निलंबित करण्याची मागणी

वारंवार किरकोळ रजा, वैद्यकीय रजा टाकून मुंबई, पुण्यात जाऊन राहणाऱ्या अधिकाऱ्यांची प्रशासनाने दखल घ्यावी आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. संबंधितांविरुद्ध कडक कारवाई केल्यानेच मुंबई, पुणे येथील अधिकाऱ्यांना जरब बसेल आणि कर्तव्यावर हजर राहतील, असा सूरही पोलीस दलात उमटत आहे.

विभागातील लोकांच्या बदलीला प्राधान्य द्यावे

या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले, प्रत्येक व्यक्तीला कुटुंब असते. पोलीस शिपाई आणि अधिकारी हा बदलीची नोकरी असली तरी वयाच्या विशिष्ट कालखंडामध्ये कुटुंबीय आणि पोलिसाला एकमेकांची गरज असते. त्यामुळे प्रत्येकाची कुटुंबासोबत किंवा परिसरात नोकरी करण्याची इच्छा असते. कर्मचारी, अधिकाऱ्यांची मूळ रहिवासी ठिकाणाच्या परिसरातच बदली झाली तर त्यांच्याकडून अधिक चांगले काम होईल आणि अशा समस्या भेडसावणार नाहीत.