नागपूर :  शहरात करोनाबाधित आणि त्यांचा मृत्यूदरही वाढला आहे. ही करोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने शासनाच्या दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास  १५ दिवस टाळेबंदी आणि त्यातही कडक संचारबंदी लावावी लागेल, असा इशारा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून  मुंढे यांनी आज गुरुवारी शहरवासीयांशी संवाद साधला. शहराला नव्हे तर विषाणूला टाळेबंदी लावायची आहे. मला काहीच होणार नाही, अशा अविर्भावात कुणी राहू नये. शहरात २ हजारच्या वर करोनाबाधित आहेत. गेल्या महिन्यात मृत्यूदर १ टक्केच्या खाली होता. आता तो १.५६ टक्के झाला आहे. नियम पाळले जात नाही. आपल्या समोरचा माणूस करोनाबाधित आहे असे समजून काळजी घेतली पाहिजे तर आपण करोनाची साखळी तोडू शकतो, असेही मुंढे म्हणाले. ऑगस्ट महिन्यात ईद, रक्षाबंधन, गणेशोत्सव, दहीहंडी, महालक्ष्मीपूजन आदी उत्सव आहेत. परंतु सार्वजानिकरित्या हे उत्सव साजरे करू नका. नियमांचे पालन करून घरीच उत्सव साजरा करा, असे आवाहनही त्यांनी केले.

खासगी डॉक्टरांना आवाहन

करोनाची लक्षणे असलेल्या रुग्णाबाबत खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी  महापालिकेला माहिती देणे आवश्यक आहे. केवळ व्हायरल आहे म्हणून रुग्णाला औषध देऊ नका. नागरिकांनी सुद्धा करोनाची लक्षणे दिसली की महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी.  खासगी रुग्णालयांना खाटा तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्णांकडून किती शुल्क घेतले जाईल, याबाबत सुद्धा  नियमावली ठरवून दिली असल्याचे आयुक्तांनी सांगितले.