महापालिकेच्या निवडणुका प्रभाग पद्धतीने घेण्याचे जवळपास निश्चित झाल्यानंतर विविध राजकीय पक्षाचे काही प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवक उमेदवारी मिळावी, यासाठी कामाला लागले आहेत. त्यातील काही इच्छुक तर वरिष्ठाच्या संपर्कात आहेत. या पाश्र्वभूमीवर एरवी कधीही वाडय़ावर न दिसणारे भाजपचे व काही अन्य राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोणी पुष्पगुच्छ तर कोणी केक घेऊन ‘साहेब लक्ष द्या अशी मानसिकता ठेवत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शुभेच्छा देण्यासाठी वाडय़ावर आल्याचे दिसून आले.
महापालिकेच्या निवडणुकीला सहा महिन्यांचा कालावधी असताना शहरातील विविध भागात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. यावेळी नाही तर पुढे कधी नाही अशी मानसिकता ठेवून काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. चार वार्डाचा एक प्रभाग करण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला असताना त्या संदर्भात लवकरच अधिसूचना निघण्याची शक्यता आहे. चार वार्डाचा एक प्रभाग ही पद्धत भाजपसाठी अनुकूल असल्यामुळे अनेकांनी उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले असताना त्यातील काही इच्छुकांनी आपापल्या प्रभागात कार्यक्रमाचे आयोजन केले तर काही पुष्पगुच्छ आणि केक घेऊन वाडय़ावर पोहचले. भारतीय जनता युवा मोर्चाची कार्यकारिणी अजूनही जाहीर झाली नसली तरी काही पदाधिकारी मात्र कार्यकारिणीत नको मात्र यावेळी उमेदवारी मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करीत असताना त्यातील काहींनी वाडय़ावर जाऊन वाढदिवसाचे निमित्त साधून गडकरी साहेबांकडे इच्छा व्यक्त केली. भाजपचा एक इच्छुक पदाधिकारी तर ढोल ताशा आणि मोठा केक वाडय़ावर घेऊन पोहचला आणि त्यांच्यासोबत छायाचित्र काढून घेतले. नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांनी कुठलेही पुष्पगुच्छ किंवा केक आणू नये, असे आवाहन केल्यानंतर अनेक उत्साही कार्यकर्ते मोठमोठे गुच्छ आणि हार घेऊन वाडय़ावर पोहचले होते. पूर्व आणि दक्षिण नागपुरातील काही पदाधिकाऱ्यांनी वाडय़ावर शक्तिप्रदर्शन करीत आपले अस्तित्व निर्माण केले.
नितीन गडकरी सकाळपासून एकीकडे आलेल्या लोकांच्या शुभेच्छा स्वीकारत असताना दुसरीकडे मात्र काही लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकारी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याची चर्चा करीत होते. एरवी कधीही वाडय़ावर न दिसणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे काही पदाधिकारी याशिवाय राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवराशिवाय उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील मंडळी मोठय़ा प्रमाणात नितीन गडकरी यांना शुभेच्छा देण्यासाठी वाडय़ावर दिसून आली. वाढदिवसाचे निमित्त साधून दक्षिण, पश्चिम, पूर्व नागपूर, मध्य आणि दक्षिण नागपुरात आरोग्य शिबीर, रोजगार आणि समाजातील गोरगरीब अपंगांना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रशासकीय कामात लोकांना येणाऱ्या अडचणी बघता लोकांची कामे लवकर व्हावी, या दृष्टीने प्रशासन आपल्या द्वारी हा उपक्रम पूर्व नागपुरात आमदार कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आला मात्र, त्या ठिकाणी अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या नावाचे मोठे होर्डिग लावले होते. गडकरी यांचा वाढदिवस नागपूर शहरात विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागात आणि वाडय़ाच्या अवतिभोवतीचा परिसर होर्डिगने सजवला होता.