पुरवठा न  झाल्यास केंद्र बंद ठेवावे लागणार

नागपूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे एक दिवस पुरेल इतकाच लससाठा आहे. शुक्रवारी  सायंकाळपर्यंत लसीचा पुरवठा झाला नाही तर शनिवारी शहरातील काही भागातील लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागू शकतात.

शहरात १८९ लसीकरण केंद्र  सुरू  असून त्यात महापालिकेचे  १०२ आणि शासकीय आणि  खाजगी ८७ केंद्र आहेत. त्यात  महापालिकेचे इंदिरा गांधी रुग्णालय, दटके आरोग्य केंद्र, पाचपावली आरोग्य केंद्रांत दररोज ४०० ते ५००लोकांना लस दिली जात आहे. परंतु आता दोन्ही लसींचा तुटवटा निर्माण झाला आहे, नागरिकांना  परत जावे लागत आहे. रोज ८ ते १० हजार लोकांचे लसीकरण केले जात असल्याचे भांडार विभागाचे प्रमुख भातकुलकर यांनी सांगितले.

दरम्यान, शुक्रवारी इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालयात कर्मचारी वेळेत न पोहचल्यामुळे आणि लस नसल्याने नागरिक संतप्त झाले. रांगेत उभे राहणाऱ्या लोकांनी  राजकीय वशिलेबाजी बंद करा अशी मागणी केली.

अनेक नागरिकांना सकाळपासून रांगेत उभे करण्यात आले आणि त्याचवेळेस दुसऱ्या प्रवेशद्वाराने  काही ओळखीच्या लोकांना आत सोडण्यात आले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी रुग्णालयातील  वैद्यकीय अधिकारी व अतिरिक्त आयुक्तांना धारेवर धरले. लोक शांत झाल्यावर तासाभरानंतर लसीकरण सुरळीत झाले. खाजगी रुग्णालयात लसीकरण बंद करणार शासकीय व महापालिका रुग्णालयात लसीचा तुटवडा बघता खाजगी रुग्णालयातील लसीकरण बंद करण्यात येणार आहे. त्याबाबतीत महापालिका प्रशासनाकडून निर्णय घेतला जाणार, असल्याचे जोशी यांनी सांगितले.

लसीकरण केंद्र

एकूण –  १८९

महापालिका – १०२ 

शासकीय व खाजगी – ८७

शुक्रवारचा लसीकरणाचा साठा

कोव्हॅक्सिन – ६०० लस

कोविशिल्ड –  ३०० लस