महापालिकेतील बडतर्फ कर्मचाऱ्याची कृती

नागपूर : महापालिकेतील एका बडतर्फ कर्मचाऱ्याने विधानभवनासमोर विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. मात्र, बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतल्यामुळे अनर्थ टळला. प्रकाश बर्डे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो महापालिकेच्या अग्निशमन विभागात वाहनचालक म्हणून कार्यरत होता.

आधीही १७ बडतर्फ कर्मचाऱ्यांपैकी विनायक पेंडकेसह पाच कर्मचाऱ्यांनी काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामगिरीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. १७ कर्मचाऱ्यांना नागपूर महापालिकेच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून त्यात प्रकाश बर्डे यांचा समावेश आहे. प्रकाश बर्डे यांना २००२ मध्ये सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. तेव्हापासून नोकरीवर परत घेण्यात यावे, यासाठी त्यांचा संघर्ष सुरू होता. न्यायालयानेही कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला होता आणि सभागृहात हा विषय आल्यावर त्याला मान्यताही मिळाली होती. महापालिका आयुक्तांनी  राज्य सरकारला फाईल पाठवली. मात्र, त्यावर कुठलाच निर्णय झाला नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष खदखदत होता. त्याचीच परिणती आज आत्महत्येच्या प्रयत्नात झाली.

प्रकरण असे आहे?

नागपूर महापालिकेने २००२ मध्ये विविध पदांसाठी कर्मचाऱ्यांची भरती केली होती. यात आरोग्य निरीक्षक, चालक, फायरमनची १०६ पदे भरण्यात आली. भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे सांगत साडेचार वर्षांनंतर या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यानंतर २०११ मध्ये यातील ८९ कर्मचाऱ्यांना नोकरीवर घेण्यात आले, परंतु १७ कर्मचाऱ्यांना त्यातून वगळले. या कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ८ जुलै २०१५ ला या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यात नोकरीवर रूजू करावे, असे आदेश दिले. सभागृहात त्याला मंजुरी मिळाली, परंतु या कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करून घेण्यात आलेच नाही.