मार्चमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षा असल्याने महापालिका निवडणुका फेब्रुवारीतच घेतल्या जातील. त्याची तयारी सुरू असून प्रशासकीय अधिकारी, महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज.स. सहारिया यांनी रविवारी सांगितले.

सहारिया यांनी रविवारी जिल्ह्य़ातील नगरपालिका निवडणुकीदरम्यान काटोल आणि कळमेश्वर येथील काही मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. महापालिकेच्या निवडणुकांची सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असली तरी अद्याप तारखेबाबत संभ्रम आहे. महापालिका निवडणुकीच्या पूर्वीच म्हणजे, तीन फेब्रुवारीला विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघात निडणुका आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका त्यानंतरच होतील, हे स्पष्ट होते. तरीही तारखांकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे. रविवारी निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया पालिका निवडणुकीच्या निमित्ताने नागपुरात आले होते. त्यांनी महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारीतच होतील, असे स्पष्ट संकेत दिले. उमेदवारांचे अर्ज आणि शपथपत्र ऑनलाइन स्वीकारण्यात येणार आहे. हस्तलिखित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.