प्रथम नगरपालिकेच्या आणि त्यानंतर होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी अनुक्रमे शहर आणि ग्रामीण भागात सुरू झाली असून या निवडणुकीतही प्रस्थापितांनी त्यांच्या सगेसोयऱ्यांना उमेदवारी मिळावी म्हणून त्यांच्या पक्षात मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

राज्यात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात नागपूर जिल्ह्य़ातील ९ पालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यात नागपूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मदारसंघातील कामठी पालिका, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री यांचे प्रभावक्षेत्र असलेली उमरेड पालिका, माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, तसेच भाजपचे विद्यमान आमदार आशीष देशमुख यांच्या मतदारसंघातील काटोल, मोहपा आणि नरखेड, राष्ट्रवादीचेच दुसरे नेते, जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री रमेश बंग यांच्या मतदारसंघातील कळमेश्वर, काँग्रेस आमदार सुनील केंदार यांच्या मतदारसंघातील सावनेर, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेली रामटेक पालिका आदींचा त्यात समावेश आहे. ८ जानेवारीला या पालिकांमध्ये नगरसेवक आणि थेट नगराध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. ९ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे सध्या तरी प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. इतर इच्छुकांकडूनही राजकीय पक्षांच्या घडामोडींवर लक्ष आहे. वार्ड पुनर्रचना आणि महिला, तसेच जातीय आरक्षणांचा प्रत्येक पालिकेतील विद्यमान दिग्गज नगरसेवकांना फटका बसला आहे. महिलांसाठी आरक्षित झालेल्या जागांवर विद्यमान नगरसेवकांकडून पत्नीसाठी उमेदवारी मागण्यात येत आहे. जातीय आरक्षणाचा फटका बसणारे नगरसेवक शेजारच्या वॉर्डासाठी मोर्चेबांधणी करू लागले आहे. तरुणांना संधी देणार, नवीन कार्यकर्त्यांना उमेदवारी देणार, असे सर्वच पक्षनेते म्हणत असले तरी प्रत्यक्ष उमेदवारी वाटप करताना मात्र ती घरातच कशी राहील, असे प्रयत्न सध्या तरी सर्वच राजकीय पक्षातून होत असल्याचे दिसून येत आहे, प्रत्यक्षात कोणी कोणासाठी उमेदवारी मागितली, याचे चित्र अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावरच पुढे येणार आहे.

काटोल पालिकेचे नगराध्यक्षपद खुल्या गटातील महिलांसाठी राखीव आहे. येथे भाजप नेते व माजी नगराध्यक्ष चरणसिंह ठाकूर त्यांच्या कुटुंबातील महिलेसाठी आग्रही आहेत. काटोल शहरात शेकापचे चांगले प्राबल्य आहे. या पक्षाचे नेते राहुल देशमुख यांना सहा वर्षांंसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ते सुद्धा नगराध्यक्षपदासाठी ‘घरा’तूनच ‘नवीन’ चेहरा देण्याची शक्यता आहे. भाजपचे मारोतराव बोरकर यांनीही सुनेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नरखेड पालिकेत भाजपपुढे वेगळाच पेच आहे. या भागाचे आमदार आशीष देशमुख यांचे नातेवाईक गुप्ता हे सध्या काँग्रेसमध्ये आहेत आणि त्यांची आघाडी नरखेड पालिकेत सक्रिय आहे. यंदाही ते आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार आहे. विशेष म्हणजे, भाजप स्थानिक राजकारणात नेहमीच गुप्ता आघाडीला विरोध करीत आले आहेत. यंदा देशमुख आणि गुप्ता यांच्यातील नातेसंबंधामुळे भाजपपुढे पेच निर्माण झाला आहे.

विदर्भात २७ नोव्हेंबर आणि १८ डिसेंबरला होणाऱ्या पालिका निवडणुकांचे पडघम आता वाजू लागले आहेत. नगरसेवकपदासह नेहमीप्रमाणेच, पण  नगराध्यपदासाठी यंदा थेट निवडणूक होत असल्याने काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना आणि पक्ष कार्यकर्त्यांलाच उमेदवारी देण्याची भाषा केली जात असली तरी नेत्यांची पावले मात्र घराणेशाहीकडेच वळताना दिसत आहेत. त्यामुळे ऐनवेळी गटबाजी उफाळून येण्याची किंवा बंडखोरीचे निशाण फडकवले जाण्याची शक्यता आहे. काही पालिकांमध्ये प्रमुख पक्षांमध्ये सरळ, कुठे तिरंगी, चौरंगी आणि कुठे बहुरंती लढतीचेही चित्र सध्या आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अद्याप कुठलेही चित्र अस्पष्ट झालेले नसले तरी राजकीय घडामोडींना वेग आला असून पक्षबदलाच्याही शक्यता वर्तविल्या जात आहेत.