शालेय पोषण आहार वितरणाचा शुभारंभ
महापालिकेच्या शाळांमध्ये २७ हजार विद्यार्थी असून त्यापैकी दक्षिण-पश्चिम नागपुरातील महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांतील ५ हजार विद्यार्थ्यांना प्रायोगिक तत्त्वावर पोषण आहार दिला जाणार आहे. या पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमता वाढाव्यात म्हणून महापालिकेच्या शाळांनाही डिजीटल करून देतो, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
केंद्रीय आहार वितरण प्रणालीमार्फत शालेय पोषण आहार वितरण शुभारंभ प्रकरणी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विवेकानंद हिंदी माध्यमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांची गर्दी होती. व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महापालिका शाळांना आज आणि यानंतरही मोफत भोजन उपलब्ध करून देणारे बंगळुरूच्या अक्षय फाऊंडेशनचे उपाध्यक्ष चंचलापती दासा, मोफत भोजनासाठी दान देणाऱ्या वंदना टिळक, वीज मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, जिल्हा परिषदेतील अधिकारी रवींद्र कुंभारे आणि शिक्षण सभापती गोपाल बोहरे व्यासपीठावर होते.
अक्षय फाऊंडेशनच्यावतीने वाठोडा मोठे स्वयंपाक घर बनवण्यात आले असून ते कायम आरोग्यदायी ठेवण्याचा प्रयत्न अक्षय फाऊंडेशन मार्फत केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात भेसळ होण्याची शक्यता कमी आहे. आहारमूल्य असलेले जेवण न मिळाल्याने महापालिकेच्या ४० टक्के मुलांची शैक्षणिक वाढ खुंटते. असे आरोग्यदायी जेवण त्यांना यापुढे मिळणार असल्याने त्यांची शैक्षणिक भूक निश्चितच वाढेल. यापूर्वी जे बचत गट पोषण आहार पुरवायचे अशा ३२ बचतगटांना हा पोषण आहार वितरणाचे काम देण्यात आहे. त्यामुळे त्यांच्या मनातील बेरोजगार होण्याची भीती नाहीशी होईल. राज्यातील ७५० पैकी ५०० ग्रामपंचायती डिजीटल करण्यात आल्या आहेत. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक वाढ होण्याच्या दृष्टीने शाळेला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी महापालिका शाळाही डिजीटल करून देतो. त्यासाठी महापालिकेने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापौरांना दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे यावेळी भाषण झाले. महापौर प्रवीण दटके यांनी गेल्या दोन वर्षांत विविध उपक्रमांमुळे महापालिकेच्या शाळेतील मुलांच्या गळतीची टक्केवारी घटली आहे. गोपाल बोहरे यांनी प्रास्ताविक केले. केंद्रीय आहार वितरण प्रणालीमार्फत शालेय पोषण आहार वितरण आजपासून सुरू झाले. या कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चंचलापती दासा यांनी देशभरात २१ लक्ष विद्यार्थ्यांना रोज भोजनदान करीत असल्याची माहिती दिली. त्यासाठी तसे स्वयंपाक घरही तयार करण्यात आले आहे. नागपुरातील मुलांसाठी १५ दिवसांसाठी नि:शुल्क भोजनासाठी वाठोडा येथे स्वयंपाक घर उभारण्यात आले आहे. त्यांनी देशभरातील त्यांच्या कामाची माहिती दिली.