News Flash

महापालिका, जि. प.च्या शाळा कचराघर झाल्या!

गेल्या काही वर्षांत महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

राम भाकरे

विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम; सफाई कर्मचाऱ्यांचेही अक्षम्य दुर्लक्ष

शाळेचा परिसर, वर्ग स्वच्छ ठेवावा असे शाळांमधून शिक्षक सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र, शहरातील काही भागातील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळाच जणू कचराघर झाल्या आहेत. या शाळांच्या सभोवताल कचरा साचत असल्याने त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे.

महापालिकेच्या शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा आणि शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी विशेष प्रयत्न केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र महापालिका आणि काही जिल्हा परिषद शाळांची आणि शाळांच्या परिसराची अवस्था फारच वाईट आहे. स्वच्छता अभियानातंर्गत शिक्षण विभागाने दोन वर्षांआधी शाळा परिसरात स्वच्छता अभियान राबवल्यानंतर शहरातील काही निवडक शाळा त्या वेळेपुरत्या स्वच्छ झाल्या. मात्र, त्यानंतर या शाळांकडे दुर्लक्ष करण्यात आले.  शहरातील विविध भागात फेरफटका मारला असता महापालिकेच्या अनेक शाळा परिसरात कचरा साचलेला होता, तर काही शाळांकडे जाणाऱ्या मार्गावर चिखल दिसून येत होता. वाठोडा, पारडी, भांडेवाडी, जागनाथ बुधवारी, टेका नाका, कळमना, वर्धमाननगर, नंदनवन, डिप्टी सिग्नल, मंगळवारी, पारडी, इंदिरानगर, दत्तात्रयनगर, बीडपेठ, मानेवाडा, पारडी, वैष्णवदेवीनगर या बाह्य़ वळण मार्गावरील महापालिकेच्या शाळांच्या परिसरात कचरा आणि जनावरांचे गोठे करण्यात तयार झाले आहेत. मंगळवारी आणि मोमीनपुरा भागात महापालिकेची उर्दू माध्यमिक शाळा आहे. या शाळेच्या बाजूला खुला भूखंड असल्याने त्या ठिकाणी लोकांनी कचरा टाकणे सुरू केले आहे. परिसरातील नागरिकांनी त्या संदर्भात झोन कार्यालयात तक्रारी केल्या. मात्र, आठ आठ दिवस तेथील कचरा उचलला जात नसल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे.  वाठोडा, पारडी आणि इंदिरानगर या भागातील महापालिका आणि जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात अशीच अवस्था आहे. शाळेचा आणि परिसरातील भाग स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी त्या त्या प्रभागातील सफाई कामगारांची असते, परंतु सफाई कर्मचारी त्या शाळांकडे फिरकत नाहीत. लकडगंज आणि नंदनवन भागात महापालिकेची शाळा सफाई नावालाच आहे. महापालिकेच्या अडगळीत पडलेल्या हातगाडय़ा शाळा परिसरात ठेवण्यात आल्या आहेत. डिप्टी सिग्नल परिसरात असलेल्या संजय गांधी नगर शाळेच्या बाहेर सार्वजानिक नळ लावण्यात आले असून शाळेचे विद्यार्थी येथीलच पाणी पित असतात. मात्र,  येथे चिखल आणि कचरा साचलेला दिसून येतो. कळमना बाजाराजवळ महापालिका आणि जिल्हा परिषदेची शाळा असून त्या शाळेच्या बाजूला हातठेले उभे असतात. त्यांच्या शेजारी कचरा टाकण्यासाठी डबे लावण्यात आले आहेत. त्या डब्यातील कचरा खाली पडल्यावर तो शाळा परिसरात येतो.

अस्वच्छतेमुळे विद्यार्थी संख्या कमी होतेय

गेल्या काही वर्षांत महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. पटसंख्या कमी होण्यासाठी शाळेभोवती असलेली अस्वच्छता, इमारतीची जीर्ण अवस्था कारणीभूत असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. गेल्या दोन वर्षांत २६ शाळा पटसंख्या नसल्यामुळे बंद पडल्या. पूर्व आणि मध्य नागपुरातील  अनेक शाळांच्या इमारतीच्या भिंती खराब झाल्या पाऊस आला की शाळा गळते. याकडे ना शिक्षक विभाग लक्ष देत ना प्रशासन.

‘‘शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जबाबदारी त्या त्या प्रभागातील सफाई कामगाराची आहे. प्रत्येक भागातील  नगरसेवकांनी ते करून घेतले पाहिजे. परिसरातील लोक शाळेभोवती कचरा टाकत असतात. हे टाळले पाहिजे. आरोग्य विभागाला सोबत घेऊन अशा शाळांना भेटी देऊन स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाईल.’’

– संध्या मेडपल्लीवार, शिक्षणाधिकारी, पालिका

* महापालिका शाळा – १६२

* कचराघर असलेल्या शाळा – २८

* सफाई कर्मचारी – ६

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2018 2:47 am

Web Title: municipality district school has become garbage house
Next Stories
1 बनावट ‘युजर आयडी’द्वारे रेल्वे ई-तिकीट विक्री
2 पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
3 लोकजागर : उमद्या व खुज्या रेषांची स्पर्धा
Just Now!
X