’ कर्णकर्कश आवाज, दुचाकींवर स्टंटबाजी
’ तरुणाईला आवर घालण्यात पोलीस यंत्रणा अपयशी
’ खामला भागात काही काळ तणावाचे वातावरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला स्वच्छता संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वातंत्र्यदिनी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भाजप नेते मुन्ना यादव यांच्या मुलाने आणि त्यांच्या साथीदारांनी डीजेच्या कर्णकर्कश आवाजात घातलेल्या धुडगूसमुळे बराच वेळ वाहतूक खोळंबल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. खामला भागात मिरवणूक पोहोचताच शिवसेना नेते पंजू तोतवानी यांचे कार्यकर्ते आणि यादव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याने काही काळ या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर सोमवारी शहराच्या विविध भागात तरुणाईने केलेली हुल्लडबाजी आणि गाडय़ांच्या शर्यतीमुळे नागपूरकरांची मान लाजेने खाली गेली. दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला नागपुरात तरुणाईचा जोश संयमापलीकडे जात आहे. या वर्षीचा स्वातंत्र्यदिनही त्याला अपवाद नव्हता. स्वातंत्र्यदिन कशासाठी साजरा केला जातो याचे भान न राहिलेल्या तरुणाईचे शहरात जागोजागी पोलीस बंदोबस्त असताना सकाळपासून हिडीस प्रदर्शन केले. हाती तिरंगा घेतलेले ट्रिबलसीट तरुण-तरुणी मोठय़ाने घोषणा देत रस्त्यांवरून जाणाऱ्यांचे लक्ष वेधण्याच्या प्रयत्नात स्वत:चा आणि रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य लोकांचाही जीव धोक्यात घालत होते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणातील अतिउत्साही तरुणाईला आवर घालण्यात पोलीस यंत्रणा कमी पडली.
मुन्ना यादव यांच्या मोठय़ा मुलाच्या नेतृत्वात साई मंदिरापासून स्वच्छता मोहिमेचा संदेश देत स्कूटर मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी भाजप नेत्यासह अनेकांनी झाडू हातात घेत केवळ छायाचित्रे काढण्यापुरती साफसफाई केली आणि त्यानंतर मात्र डीजेवर यादवी धिंगाणा सुरू करण्यात आला. खामला भागात स्कूटर मिरवणूक पोहोचताच त्या ठिकाणी शिवसेना नेते पंजू तोतवानी यांच्या कार्यकर्त्यांची स्कूटर मिरवणुकीची तयारी सुरू होती. त्यामुळे त्यांचे चारशे ते पाचशे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. दोन्ही मिरवणुका एकत्र आल्यामुळे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांंमध्ये वादावादी झाली. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने मोठी घटना टळली. दरम्यान, या भागात वाहतूक ठप्प झाली असताना यादव यांच्या मिरवणुकीतील कार्यकर्ते स्टारबसवर चढून आणि हातात तिरंगा घेत मोठमोठय़ा ओरडत होते. जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना अडविले जात होते. मात्र, पोलिसांकडून त्याच्यावर कुठलीही कारवाई केली जात नव्हती. पंजू तोतवानी यांच्या कार्यकत्यार्ंनी काढलेल्या मिरवणुकीत युवकांचे अशाच पद्धतीचे हिडीस प्रदर्शन बघायला मिळाले. देशभक्तीच्या नावावर कार्यकर्त्यांनी डीजेवर कर्णकर्कश आवाजात रस्त्यावर िधगाणा घातला. मात्र, याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले.
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तरुणांची सर्वाधिक टोळकी फुटाळा तलाव, शंकर नगर ते लॉ कॉलेज चौक, सदर, बैरामजी टाऊन अमरावती मार्ग, वर्धा मार्ग, सीताबर्डी, धरमपेठ, गोकुळपेठ, प्रतापनगर चौक, त्रिमूर्ती नगर चौक, नंदनवन, मुळक इंजिनिअरिंग कॉलेजसमोरचा रस्ता या भागात अक्षरश: धुमाकूळ घालत होती. अनेकांना पोलिसांनी पकडले. परंतु, या बेधुंद तरुणाईला आवर घालण्यासाठी पोलीस यंत्रणा फारशी प्रभावी ठरत नसल्याचेच चित्र होते. काही चौकात तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांची तरुणाईने तर दखलच घेतली नाही. पोलिसांच्या नाकावर टिच्चून ट्रिबलसीट मोटारसायकली भन्नाट वेगाने जात होत्या. दुचाकींवर स्टंटबाजी करणारी आणि उघडय़ा जीपमध्ये बसलेली टोळकी कर्णकर्कश आवाजात डेक लावून मार्गावरून फिरली. यामुळे शाळांमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या पालकांच्या जीवाची अक्षरश: घालमेल झाली. भन्नाट वेगातील दुचाकीस्वारांना चुकवून मार्ग काढणे अत्यंत कठीण झाले होते. सकाळी १० वाजतानंतर तर या अतिउत्साहाला आणखी उधाण आले असताना मुख्यमंत्र्यांच्या या शहरात या हैदोस घालणाऱ्या यादवांवर कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहे.