केवळ दोनच बैठकांना उपस्थिती
भाजप नेते, नगरसेवक, मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मुन्ना यादव यांचे अग्निशमन समितीच्या कामकाजाकडेही दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या महत्त्वाच्या अग्निशमन समितीच्या अध्यक्षपदी असताना समितीच्या कामकाजात लक्ष घालण्याला त्यांना वेळ नाही. ते आतापयर्ंत फक्त दोनच बैठकांना उपस्थित होते. इतर बैठका समितीचे सदस्य व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडल्या. त्यामुळे यादव यांची या समितीवरील उपयोगिता काय? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.
राज्याच्या उपराजधानीचे हे शहर देशाच्या राजकीय घडामोडींचे केंद्रही आहे. देशातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून घातपात घडविणारे या शहरात दाखल होण्याची भीती आहे, या शिवाय येथे पेट्रोल आणि गॅसचे डेपोही आहेत. शहरातील अनेक वस्त्यांना पुराचाही धोका आहे, जीर्ण इमारतींची संख्याही मोठी आहेत. या पाश्र्वभूमीवर अग्निशमन दलाचे व पर्यायाने समितीचे महत्त्व लक्षात येते. ही यंत्रणा सक्षम करण्याचे प्रयत्न प्रशासन आणि समितीकडून होणे अपेक्षित आहे. मात्र, समितीच्या अध्यक्षांनाच याचे सोयरसुतक नसल्याने सध्या प्रशासनाकडेच सर्व सूत्रे आहेत.
या विभागातील कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. विभागात नवीन साधनांची गरज आहे. समितीचे माजी अध्यक्ष किशोर डोरले यांनी त्यांच्या कार्यकाळात काही प्रस्ताव शासनाकडे पाठविले होते. मधल्या काळात डोरले यांना समितीच्या प्रमुखपदावरून हटविण्यात आले. तेथे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून मुन्ना यादव यांची वर्णी लावण्यात आली. त्याला एक वर्ष होत आले आहे. आतापर्यंत समितीच्या केवळ पाच बैठका झाल्या. त्यातील दोनच बैठकीला ते उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महापालिकेच्या नव्या कायद्यानुसार प्रत्येक महिन्यात विभागाची बैठक होणे आवश्यक आहे. ती होत नसल्यामुळे समितीच्या अन्य सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष सुधीर राऊत यांच्याकडे समितीचे उपाध्यक्षपद आहे. मात्र, ते या विभागाला पुरेसा वेळ देऊ शकत नाही त्यामुळे हा विभाग सध्या तरी दुर्लक्षित आहे. मुन्ना यादव यांच्याकडे राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्षपद आहे. त्यांचा बहुतांश वेळ हा मुंबईतच जातो, त्यामुळे समितीच्या कामकाजाकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडेही वेळ नाही. अग्निशमन दिनाच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहात नाहीत. अग्निशमन विभागात ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यास विलंब लागतो, अशा तक्रारी आहेत. उंच इमारतीला लागलेली आग विझविण्यासाठी लागणारी ‘टीटीएल’ यंत्र वर्षभरात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, समितीकडूनही त्याचा पाठपुरावा केला जात नाही. यादव यांचे सरकार दरबारी चांगले वजन असल्यामुळे आणि मुख्यमंत्र्याचे निकटवर्तीय असल्यामुळे अग्निशमन विभागात अनेक सोयी सुविधा निर्माण होण्यासोबत रिक्त पदे भरण्यात येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, सहा महिन्यांवर निवडणुका आल्या असताना त्याकडे सध्या दुर्लक्ष केले जात आहे.