14 December 2019

News Flash

कारसाठी रस्ता न दिल्याने खून

ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास राजाबाक्षा हनुमान मंदिरामागे घडली.

नागपूर : रस्त्याने जात असताना समोरच्या कारचालकाने मागील कारचालकाला पुढे जाण्यासाठी जागा न दिल्याने उद्भवलेल्या भांडणातून तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास राजाबाक्षा हनुमान मंदिरामागे घडली.

विजय रमेश खंडाईत (३०) रा. साकीत अपार्टमेंट, नरेंद्रनगर असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी यशवंत सीताराम चव्हाण (४७), संजय सीताराम चव्हाण (४४) आणि दिनेश सीताराम चव्हाण (५१) सर्व रा. रतन हाईट्स, मेडिकल चौक यांना अटक करण्यात आली असून त्यांना २२ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मृत विजय हा बियाणे विक्री करणाऱ्या जीएसपी क्रॉप सायन्स प्रा. लि. नावाच्या कंपनीत क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक पदावर कार्यरत होता. काम संपल्यानंतर तो नेहमीप्रमाणे रामबाग परिसरातून रामेश्वरीनगरच्या कारने जात होता.  आरोपी यशवंत याची कार त्याच्यासमोर होती. अचानक यशवंतने रस्त्याच्या मधोमध कार थांबवली. विजयने कार बाजूला घेण्यासाठी अनेकदा भोंगा वाजवला. पण, यशवंतने कार बाजूला केली नाही. यावरून दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यावेळी यशवंतने कारमधील चाकूने विजयवर हल्ला केला. पण, बलदंड शरीरयष्टीच्या विजयने त्याचा चाकू हिसकावून त्याच्यावरच वार केला. या झटापटीत विजयच्या हातून चाकू जमिनीवर पडला. तो  यशवंतने उचलून विजयच्या गळ्यावर वार केला. अधिक रक्तस्राव होऊ लागल्याने तो जमिनीवर कोसळला व यशवंत कार घेऊन पळून गेला. यशवंतच्या हातालाही जखम झाली. तो मेडिकलमध्ये उपचारासाठी गेला. त्या ठिकाणी आपल्या भावांना बोलावून घेतले. त्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी यशवंतला दुसरीकडे नेले. घटनेची माहिती मिळताच इमामवाडा पोलीस  पोहोचले. गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. आरोपींना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर केले असता २२ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींची गुन्हेगारी पाश्र्वभूमी असून २००५ मध्ये खुनाच्या गुन्ह्य़ातून त्यांची सुटका झाली आहे.

मध्यस्थीसाठी कुणीच धावले नाही

दोघांमध्ये झटापट सुरू असताना रस्त्यावरची वाहतूक खोळंबली होती. अनेकजण रस्त्यावर उभे  बघत होते. पण, कुणीच मध्यस्थीसाठी धावले नाही. या प्रसंगावरून इतरांच्या मदतीसाठी धावण्याची भावनाच समाजातून लोप पावत असल्याची टीका होत आहे.

First Published on November 20, 2019 2:11 am

Web Title: murder in nagpur for not giving pass for car zws 70
Just Now!
X