कपिलनगरात बहिणीची छेड काढणाऱ्या गुंडाची हत्या; दुचाकीचा धक्का लागल्याने यशोधरानगरमध्ये खून

नागपूर : गेल्या चोवीस तासांमध्ये दोन वेगवेगळ्या परिसरात दोन खुनाच्या घटना घडल्याने उपराजधानी हादरली. मागील तीन दिवसांमध्ये तीन खुनाच्या घटना घडल्या असून पुन्हा शहरात खुनाचे सत्र सुरू होणार की काय, अशी चर्चा पोलीस वर्तुळात आहे.

पहिली घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. राजू मारोती रंभाड (४१), रा. बिनाकी असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एक  अल्पवयीन मुलगा आणि शुभम वंजारी (२१) या आरोपींना अटक केली. आरोपीपैकी अल्पवयीन मुलाच्या वडिलाचे रविवारी निधन झाले होते. अंत्यसंस्कारानंतर तो शुभमसह घरी परत येत होता. त्यावेळी रस्त्यावर राजू उभे होते. आरोपींनी त्यांना कट मारली. यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून अल्पवयीन मुलगा चाकू घेऊन परतला व त्यांनी राजू यांना भोसकले. त्यानंतर आरोपी पळून गेले. राजू यांना मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.

दुसरी घटना कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री  घडली. बहिणीचा पाठलाग करून छेड काढणाऱ्या कुख्यात गुंडाचा दोन भावांनी मिळून खून केला. तुषार सुनील गजभिये (२४), रा. तक्षशीलानगर आणि प्रेमचंद ऊर्फ टोनी मारोतकार (२३), रा. स्वामीनगर अशी आरोपींची नावे असून त्यांना अटक करण्यात आली.

दीपक ऊर्फ गोलू देशराज राजपूत (२६), रा. कडू लेआऊट असे मृताचे नाव आहे. गोलूविरुद्ध जवळपास सहा गुन्हे दाखल आहेत. शस्त्राच्या बळावर तो वस्तीत दादागिरी   तसेच परिसरातील महिला व मुलींची छेड काढायचा. यामुळे संपूर्ण वस्ती त्याच्यापासून त्रासली होती. गेल्या काही दिवसांपासून तो आरोपी तुषारच्या बहिणीला त्रास देत होता. तिच्यावर अश्लील शेरेबाजी करायचा. त्यामुळे त्याने गोलूला संपवण्याचा निर्णय घेतला.

रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास गोलू हा उप्पलवाडी परिसरात तुषारला दिसला. त्याने टोनीला फोन करून बोलावून घेतले. गोलूला रस्त्यात गाठले व पकडून विटाभट्टीकडे नेले. अंधारात चाकू व तलवारीने वार करून त्याचा खून केला.