18 February 2020

News Flash

वरातीत नाचण्याच्या वादातून खून

लग्नाच्या मंडपातच दोन्ही गटातील तरुण एकमेकांना मारहाण करू लागले

प्रतिनिधिक छायाचित्र

वधू-वरांचे मित्रमंडळीच भिडले

नागपूर : लग्न समारंभातील डीजेच्या तालावर नाचण्यावरून वधू व वराकडील मित्रमंडळीमध्ये वाद निर्माण झाला व यावरून दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला केला. यामध्ये वधू पक्षाकडील एकाचा खून झाला असून इतर चारजण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास कळमना पोलीस हद्दीतील कामठी मार्गावर घडली.

निखिल हरिदास लोखंडे (२९) रा. पंचशील बौद्धविहारजवळ, गिट्टीखदान असे मृताचे नाव आहे, तर विक्की सुनील डोंगरे (२८) रा. गोरेवाडा, सोनू सोहन शाहू, आकाश दिलीप लोखंडे आणि निखिल प्रकाश कांबळे रा. गिट्टीखदान अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कळमना पोलिसांनी दंगल घडवून खून करण्याचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. शुभम ऊर्फ भय्यालाल सिद्दीसोनू (२१), मनोज सिद्धीसोनू (२४) दोन्ही रा. महेशनगर आणि राहुल बाबूसिंग भाटी (२४) रा. प्रेमनगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.  गणेश नंदनवार रा. महेशनगर आणि नम्रता कुरुटकार रा. बिनाकी मंगळवारी यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांच्या कुटुंबाच्या संमतीने त्यांचा विवाह सोमवार, २० जानेवारीला ठरला. विवाह सोहळा कळमना पोलीस  हद्दीतील अमन लॉनवर सायंकाळी होता. लग्न समारंभात वधू व वरांकडून जवळपास हजार पाहुणे आले होते. या ठिकाणी डीजे लावण्यात आला होता व दोन्हीकडील पाहुणे नाचत होते. निखिल लोखंडे हा वधू नम्रता हिच्या खास मैत्रिणीचा पती होता व त्यानेच लग्न जुळवून आणण्यात मोठी मदत केली होती. तो आपल्या मित्रासह नाचत असताना वराचे मित्रही तेथे नाचत होते. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास दोन्ही गटाचा एकमेकांना धक्का लागला व त्यांच्यात वाद झाला. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला. त्यानंतर रात्री ११.३० वाजताच्या सुमारास पुन्हा दोन्ही गटात वाद होऊन तो विकोपाला गेला. लग्नाच्या मंडपातच दोन्ही गटातील तरुण एकमेकांना मारहाण करू लागले. यावेळी आरोपींनी शस्त्र काढून मंडपाच्या प्रवेशद्वारावर वधू पक्षाकडील तरुणांना भोसकले व पळून गेले. उपस्थितांनी जखमींना मेयो रुग्णालयात दाखल केले. यात जखमी झालेल्या निखिल याला उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले, तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.

First Published on January 22, 2020 3:27 am

Web Title: murder in nagpur over dispute in dance zws 70
Next Stories
1 राज्यात मुंबई सर्वाधिक प्रदूषित
2 नागपुरात लग्न समारंभात डीजे वाजवण्यावरून वाद, एकाची हत्या; चौघे जखमी
3 युवकाने तब्बल अडीच वर्षांनी तोंड उघडले!
Just Now!
X