19 October 2019

News Flash

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच अडूळकरची हत्या!

कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झेंडा चौकात एका महिलेने मुलांच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना गुरुवारी घडली

(संग्रहित छायाचित्र)

पत्नीच्या सुमारे १५ तक्रारींकडे पोलिसांचे दुर्लक्ष

कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झेंडा चौकात एका महिलेने मुलांच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेसाठी पोलिसांचा हलगर्जीपणाही कारणीभूत असल्याची माहिती आता समोर येत आहे. मागील काही महिन्यांमध्ये आरोपी महिलेने मृत पतीविरुद्ध मारहाणीच्या जवळपास १५ तक्रारी केल्या होत्या, पण कोतवाली पोलिसांनी चिरीमिरी घेऊन प्रकरण मिटवल्याचे आरोप आता केले जात आहेत.

रवींद्र वामनराव अडूळकर (५३) रा. जयताळा असे मृताचे नाव आहे. त्याच्या खुनासाठी पत्नी रवीना ऊर्फ उषा (४८), मुलगा अक्षय (२६) आणि अभिषेक (२१) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायदंडाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी पोलीस कोठडी सुनावली आहे. रवींद्रला दारूचे व्यसन होते. तसेच त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. २०१५ मध्ये रवींद्र व रवीना यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्या प्रकरणी गुन्हा दाखल करून न्यायालयात खटला भरण्यात आला. तेव्हापासून रवींद्र हा एका महिलेसोबत जयताळा परिसरात राहात होता.

वडिलोपार्जित घर व गाळे आपल्या ताब्यात घेण्यासाठी रवींद्र प्रयत्न करीत होता. यासाठी तो वेळोवेळी रवीनाला  मारहाण करून घर सोडायला सांगायचा. गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये त्याने पत्नीला अनेकदा मारहाण केली. रवीना व मुलांनी पोलिसांत अनेकदा तक्रारही दिली. पण, कोतवाली पोलिसांनी रवींद्रकडून चिरीमिरी घेऊन कोणतीच कारवाई न करता त्याला प्रत्येक वेळी सोडून दिले. तक्रार दिल्यानंतरही पोलीस कारवाई करीत नाही, असा समज झाल्याने रवीनाने मुलांसह मिळून पतीलाच संपवले. यासाठी परिस्थिती जेवढी कारणीभूत आहे, तेवढेच जबाबदार कोतवालीचे पोलीस अधिकारी व कर्मचारी असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे रवीना व तिच्या मुलांनी आजवर किती तक्रारी दिल्या, त्या कुणी हाताळल्या व त्यावर कारवाई का झाली नाही, याचाही तपास होण्याची आवश्यकता असून हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी अडूळकर कुटुंबाच्या सदस्यांनी केली आहे.

कुख्यात गुंडाकडून इमारत रिकामी करण्याचा प्रयत्न

रवींद्रने रवीना व मुलांना वडिलोपार्जित घरातून हुसकावून लावण्यासाठी साम, दाम, दंड, भेद असे सर्व उपाय योजले होते. काही महिन्यांपासून त्याने इमारतीच्या एका गाळ्यात मोमिनपुरा येथील कुख्यात गुंड जाखीर याला आणून बसवले होते. त्याला इमारत खाली करून देण्याचे काम दिले होते, अशी माहिती समोर येत आहे.

चौकशी करून कारवाई करू

कोतवाली पोलिसांनी २०१५ च्या गुन्ह्य़ात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. याव्यतिरिक्त आरोपींनी मृतांविरुद्ध तक्रार दिली होती का, हे तपासण्यात येईल. चौकशी करून संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

– राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३.

First Published on May 11, 2019 12:18 am

Web Title: murder of adulkar is due to the incompetence of the police