23 July 2019

News Flash

विकासाचे राजकारण हेच माझे ध्येय

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी जाहीर सभा घ्यावी. त्यातून त्यांनी भाजप आणि माझ्यावर टीका करावी.

नितीन गडकरी

नितीन गडकरी यांचे प्रतिपादन; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भे

सार्वजनिक जीवनात वावरताना विकासाचे राजकारण हेच ध्येय राहिले आहे. जातीपातीच्या व धर्माच्या राजकारणाचा कधी विचार केला नाही. त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्नही केला नाही. नागपूरचा सर्वागीण विकास करताना सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, पायाभूत सुविधा या प्रत्येक गोष्टीकडे आवर्जून लक्ष दिले. त्यामुळे कुणी जातीपातीचे राजकारण करू पाहत असेल तर त्याचा माझ्यावर परिणाम होणार नाही व जनताही ते स्वीकारणार नाही, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

गडकरी यांनी गुरुवारी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी स्थानिक ते राष्ट्रीय राजकारण, नागपूर आणि विदर्भातील सिंचन, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत दिलखुलास उत्तरे दिली.

ते म्हणाले, मी जातीचे राजकारण कधी केले नाही. विकासाची कामे करताना कोणत्या पक्षाचा मतदारसंघ  आहे किंवा कोणत्या जाती-धर्माची व्यक्ती तिकडे राहते, असा विचार कधी केला नाही. २०१४ च्या निवडणुकीत मी नवीन होतो. पालकमंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव होता. परंतु यावेळी पाच वर्षे केलेली कामे माझ्या पाठीशी आहेत. शहरात भरपूर कामे झाली आहेत आणि येत्या काही महिन्यात आणखी कामे होणार आहेत. नागपुरात ४० ते ४५ हजार कुटुंबांना व्यक्तिश: ओळखतो. अर्धे काँग्रेसवालेच निवडणुकीत मदत करतील, असेही ते मिश्किलपणे म्हणाले.

विदर्भवाद्यांना सल्ला

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी जाहीर सभा घ्यावी. त्यातून त्यांनी भाजप आणि माझ्यावर टीका करावी. तो त्यांचा अधिकार आहे, परंतु आमच्या सभेत गोंधळ घालून भाषण बंद पाडू नये, असा सल्ला त्यांनी विदर्भवाद्यांना दिला.

.. याची खंत वाटते

नाग नदी सौंदर्यीकरणाचे स्वप्न होते. त्यासाठी प्रयत्न केले. मात्र प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही, याची खंत वाटते, असे गडकरी म्हणाले.

नानाजी देशमुखांप्रमाणे काम करण्याची इच्छा

केंद्रात पुन्हा सत्ता आल्यास कोणते मंत्रालय सांभाळायला आवडेल, असा प्रश्न गडकरी यांना केला असता त्यांनी भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयात आपण आनंदी असल्याचे सांगितले. राजकारणात आपल्याला क्षमतेपेक्षा बरेच अधिक  मिळाले.  कोणत्या पदासाठी आपण काम करीत नाही. भविष्यात भारतरत्न नानाजी देशमुख यांच्याप्रमाणे ग्रामीण भागात काम करण्याची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.

‘सर्वसमावेशक भाजप’चे प्रयत्न कमी पडले

भाजप हा उच्चवर्णीयांचा, ब्राह्मणांचा पक्ष आहे, अशी जी धारणा सुरुवातीपासून निर्माण झाली ती आजही बऱ्याच अंशी कायम आहे, परंतु वास्तविकता वेगळीच आहे. दलित, मुस्लीम आणि इतरही अल्पसंख्यांक समुदायाच्या विकासासाठी आमच्या पक्षाच्या सरकारने सर्वात जास्त काम केले आहे. लंडनमधील डॉ. आंबेडकर राहायचे ते घर, इंदू मिलची जागा मिळवणे, अशी अनेक उदाहरणे देता येतील. परंतु इतके करूनही भाजप हा सर्वसमावेशक पक्ष आहे ही भावना या समाजात रुजवण्यात आम्ही कमी पडलो, अशी कबुलीही गडकरींनी या भेटीत दिली.

७२ हजार कोटींची विकासकामे

गेल्या पाच वर्षांत ७२ हजार कोटींची कामे सुरू झाली आहेत. त्यात मेट्रो, सिमेंट रस्ते, पूल, उड्डाण पूल, स्टेडियम यांचा समावेश आहे. शिवाय वैद्यकीय सुविधेचा दोन लाख लोकांना फायदा  झाला आहे. नागपुरात राष्ट्रीय शिक्षण संस्था आल्या आहेत. त्यात आयआयएम, एम्स, सिम्बोईसिस आदींचा समावेश आहे. तसेच अजनी रेल्वे स्थानकाला इंटर मॉडेल स्टेशन म्हणून विकसित केले जात आहे. मिहानची स्थिती खराब होती, परंतु आमचे सरकार आल्यानंतर स्थिती सुधारली. त्यामुळे २३ हजार १०१ थेट रोजगार आणि ४२ हजार ९८७ अप्रत्यक्ष रोजगार मिळाले आहेत, असा दावाही त्यांनी केला.

महालातच परत जाणार

महालातील गडकरी यांचे निवासस्थान हे अलीकडच्या काळात राजकारणाचे केंद्र होते. खुद्द गडकरी यांच्यावर महाल संस्कृतीची छाप आहे. या निवासाचे नूतनीकरण सुरू असल्याने सध्या गडकरी रामनगर येथील घरी राहतात. मात्र, ते या भागात रमले नाहीत. घराचे काम पूर्ण झाल्यावर महालमध्ये  परत जाणार असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांचे  कौतुक

अशक्य ते शक्य करण्याची क्षमता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात आहे, या शब्दात गडकरी यांनी त्यांचे कौतुक केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी जनता दरबार घेऊन लोकांच्या तक्रारींचे निरसन केले. यावेळी लोकांच्या रोषाला त्यांना तोंड द्यावे लागले होते. या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर गडकरी यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

पटोलेंना आशीर्वाद, पण जिंकणार मीच

नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांना भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र, ही निवडणूक आपण गतवेळपेक्षा अधिक मताधिक्क्याने विजयी होऊ, असा विश्वासही व्यक्त केला. नागपुरात भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे

नाना पटोले अशी लढत

होणार आहे. नाना पटोले हे एकेकाळी नितीन गडकरी यांचे सहकारी होती. मधल्या काळात भाजपबरोबर मतभेद झाल्यानंतर त्यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने आता त्यांना नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांच्याविरोधात उमदेवारी दिली

आहे. त्या पाश्र्वभूमीवर आज सकाळी माध्यमांशी बोलताना गडकरी यांनी पटोले यांना शुभेच्छा दिल्या. ते पूर्वीही माझे मित्र होते आणि आताही आहेत. त्यांनी पक्ष सोडला म्हणून माझा आशीर्वाद संपला, असे नाही. ते तरुण आहेत, त्यांनीही लढले पाहिजे. माझा आशीर्वाद त्यांना आहे. मात्र, गेल्यावेळीपेक्षा जास्त मते भाजपला मिळतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

मुले राजकारणात येणार नाहीत

राजकीय नेत्यांची मुले राजकारणात सक्रिय होत आहेत. मात्र, गडकरी यांनी त्यांची मुले या क्षेत्रात येणार नाहीत, असे ठासून सांगितले. नेत्यांची मुले राजकारणात येणे वाईट नाही. ज्यांच्यामध्ये क्षमता आहे ते  येतात. मात्र माझा मुलगा, पत्नी किंवा घरातील कुणीही राजकारणात येणार नाही आणि त्यांची इच्छाही नाही. दोन्ही मुले आपापल्या क्षेत्रात काम करीत आहेत. राजकारणावर ते चर्चा सुद्धा करीत नाही. असेही गडकरी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकारणात आले ते वडील गंगाधरराव फडणवीस यांच्यामुळे नाही, तर मी त्यांना  राजकारणात आणले याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

नवनवीन संकल्पना आणि योजना

गडकरी यांनी यावेळी विकासाच्या नवनवीन संकल्पना सांगितल्या. भविष्यात राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांचीही माहिती दिली. स्काय बस, विमानतळावरील उद्यान, अंबाझरी, तेलंगखडी उद्यान परिसराचा विकास इलेक्ट्रिक, इथेनॉल, सीएनजीवर धावणाऱ्या बसेस आणि इतरही अनेक प्रकल्पांची यादीच त्यांनी जाहीर केली.

First Published on March 15, 2019 1:06 am

Web Title: my goal is development politics says nitin gadkari