नागपूरमध्ये गेल्या २४ तासांत तीन हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजू नारंग (वय ५५ वर्ष) यांची अपहरण करुन हत्या करण्यात आली असून गेल्या चार दिवसांपासून ते बेपत्ता होते. नारंग यांचे मावस भाऊ नागपूरमधील मोठे व्यापारी आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती दिवसेगणिक खालावत आहे. नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु असतानाच आशीर्वाद नगर येथे एका तरुणाची हत्या करण्यात आली. कबीर उर्फ अन्ना रावण दुरई (वय ४५) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव होते. याप्रकरणात पोलिसांनी नवीन गोटेफोडे (वय २७) या आरोपीला अटक केली होती. १० हजार रुपये उसने देण्यावरुन नवीनने कबीरची हत्या केली होती. तर दुसऱ्या घटनेत सुरेंद्रगढ परिसरात प्रेमलाल देसाई (वय ४५) यांची हत्या करण्यात आली होती. जिल्हा न्यायालयातून जीपीओ चौकाकडे जात असताना मारेकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता.

दोन्ही घटना ताज्या असतानाच आता राजू नारंग यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. एका ख्यातनाम कंपनीच्या अकाऊंट्स विभागात ते कामाला होते, असे समजते. त्यांचे बंधू हे नागपूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. नारंग हे २७ डिसेंबर पासून बेपत्ता होते. त्यांचे दोन्ही मोबाईलही बंद होते. सोमवारी सकाळी मौदा येथे त्यांचा मृतदेह आढळला. नागपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेवरुन हिवाळी अधिवेशनात विरोधकांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्यावर टीका केली होती. मात्र, यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.