उपराजधानीत आज शनिवारी एकाच दिवशी तब्बल ६१ नवीन करोनाग्रस्त आढळले. विशेष म्हणजे, रामदासपेठ आणि मेहंदीबाग परिसरात प्रथमच बाधित नोंदवण्यात आल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

रामदासपेठेत करोना बाधित आढळलेली व्यक्ती जिल्ह्य़ा बाहेरून शहरात आली. गृह विलगीकरणात असतांना खासगी प्रयोगशाळेत  चाचणी केली असता त्याला विषाणूची बाधा असल्याचे स्पष्ट झाले.  शहरात नवीन बाधित आढळलेल्यांमध्ये नाईक तलाव- बांगलादेश परिसरातील १८, नारायण पेठ (प्रेम नगर) १३, लष्करीबाग ४, सावनेर  ३, गणेशपेठ ३, हिंगणा ३, मेहंदीबाग १, उप्पलवाडी १, कळमेश्वर १ आणि इतरही काही ठिकाणच्या रुग्णांचा समावेश आहे. सर्व रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून सुरू आहे.

या नवीन रुग्णांमुळे शहरात आजपर्यंत आढळलेल्या एकूण बाधितांची संख्या   १,२६६ वर पोहचली आहे. त्यातच दिवसभऱ्यात सर्वाधिक बाधित आलेले व्यक्ती हे पाचपावली विलगीकरण केंद्रात असल्याची माहिती आहे. या रुग्णांना तातडीने  मेडिकल, मेयोसह एम्समध्ये हलवण्यात आले. त्यातच शहरात शनिवारी एम्समधून ५, मेयोतून १२ जणांसह मेडिकलमध्येही काही जण करोनामुक्त झाले.

रुग्णाच्या पलायन नाटय़ाने मनस्ताप

मेयोत दोन दिवसांपूर्वी हंसापुरी परिसरातील एक संशयित महिला उपचाराला आली होती. तिचे नमुने घेतल्यावर काही तासात ती बेपत्ता झाली.  तिचा अहवाल सकारात्मक आल्याने तिचा शोध घेतल्यावर हा प्रकार पुढे आला. काही तासात ती परतल्याने प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला.  मेडिकलमधूनही काही दिवसांपूर्वी सारीचा एक संशयित रुग्ण अचानक बेपत्ता झाला होता. ही माहिती पुढे आल्यावर अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक उडाली होती. काही तासांनी हा रुग्ण परतला होता.

हिंगणा परिसर नवा ‘हॉटस्पॉट’

शहराला लागून असलेला  हिंगणा व वानाडंोंगरी परिसर नवा ‘हॉटस्पॉट’ ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या परिसरात आतापर्यंत २८ रुग्ण करोना बाधित आढळले आहेत.  हिंगणा व बुटीबोरी अशा दोन एमआयडीसी येथे आहेत. हिंगणा एमआयडीसी परिसराला लागून असलेल्या नीलडोह, डिगडोह, इसासनी व वानाडोंगरी या दाट  वस्तीच्या वसाहती असून या ठिकाणी कामगार  मोठया प्रमाणात आहे. याशिवाय शिक्षक कॉलनी, अमरनगर, श्रमिक नगर या ठिकाणी कामगार राहत असून येथे करोनाचे रोज नवीन रुग्ण आढळत आहेत. येथे काही अटी शर्तींवर कंपन्यांना उत्पादनास परवानगी देण्यात आली आहे. परंतु याच  परिसरात करोना फोफावत आहे. त्यामुळे काही काळासाठी एमआयडीसी पूर्णत:हा बंद करून टाळेबंदी अधिक कठोर करावी, संशयित  रुग्णांच्या चाचण्या अधिक जलद करण्यात याव्या, अशी मागणी आमदार समीर मेघे व माजी मंत्री रमेश बंग यांनी केली आहे.

प्रेमनगर, लष्करीबागेत धोका वाढला

शहरातील नारायण पेठ (प्रेमनगर) येथे दिवसभऱ्यात १३ तर लष्करीबाग परिसरात नवीन ४ बाधित आढळले. येथे वाढलेले रुग्ण बघता हे नवीन हॉटस्पॉट ठरणार काय, ही चिंता नागरिकांना सतावत आहे.