अपेक्षेप्रमाणे हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतील घोळ, कापसावर पडलेल्या बोंडअळीने विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील शेतकऱ्यांची झालेली हजारो कोटींची हानी, विषारी कीटकनाशकांमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा झालेला मृत्यू व राज्यभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्थेवरून विरोधी पक्ष काँग्रेस आणि राट्रवादीच्या आमदारांनी अधिवेशन सुरु होण्याआधीच कर्जमाफीसह अनेक मुद्द्यांवरुन विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून घोषणा दिल्या. ‘भाजप सरकार हटवा, कापूस वाचवा’, ‘जो सरकार निकम्मी है’, वो सरकार बदलनी है’, ‘हे नव्हे माझं सरकार’ अशा सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणांचे फलक आमदारांच्या हातात होते. आघाडी सरकारने १५ वर्षात काय केले, हे विचारत बसण्यापेक्षा तुम्ही मागच्या ३ वर्षात काय केले, याचा हिशेब द्या, अशी मागणी अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केली.

दरम्यान, विधीमंडळाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाचे आमदार सरकारविरोधात घोषणा देत वेलमध्ये गेले. कामकाज सुरू होताच गोंधळ सुरू झाला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सरकारविरोधात घोषणा देत होते. नही चलेगी, नही चलेगी दादागिरी नही चलेगी अशा घोषणा दिल्या जात होत्या.

दुसरीकडे विदर्भवादीही आक्रमक झाल्याचे दिसून आले. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी येथील व्हरायटी चौकात निर्दशने करण्यात आली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चाही नागपूर शहरात आला. यावेळी राष्ट्रवादीने शहरातील शरद पवार महाविद्यालयाजवळ चक्काजाम आंदोलन केले. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांत बाचाबाचाही झाली.