देशातील लघु व मध्यम उद्योगांची सध्या वाईट अवस्था आहे. या संस्थांना बळकट करण्यासाठी नागपुरातील विश्वेश्वरैय्या तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) मदत करणार आहे. छोटय़ा उद्योगांच्या विविध समस्यांवर तोडगा काढत, त्यांना आवश्यक तंत्रज्ञानाची मदत करण्याच्या उद्देशाने सूक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाद्वारे (एमएसएमई) व्हीएनआयटीला संमती (नोडल) संस्थेचा दर्जा देण्यात येणार आहे.

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना नेहमीच वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु त्या सोडवण्यासाठी विशिष्ट अशी मदत होताना दिसत नाही. देशभरातील नामवंत शैक्षणिक संस्थांमध्ये संशोधन होते. मात्र, त्याचा फायदा या उद्योगांना फारसा होत नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या मंत्रालयामार्फत देशभरातील नॅशनल इन्स्टिटय़ूट टेक्नॉलॉजीमध्ये (एनआयटी)  होणाऱ्या संशोधनाचा लाभ या उद्योगांना व्हावा या दृष्टीने पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. यासाठी ‘हब अन्ड स्पोक’ मॉडेलचा वापर करून  विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेला ‘नोडल’ संस्था म्हणून जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. देशातील इतर ३० एनआयटीचा यात सहभाग राहणार आहे. या एनआयटींच्या माध्यमातून त्या-त्या क्षेत्रातील छोटय़ा उद्योगांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण, उद्योगांना लागणारे तंत्रज्ञान,  गुणवत्ता वाढवण्यासाठी संसाधने उपलब्ध करून दिले जाणार आहे. शिवाय उद्योगांद्वारे आवश्यक यंत्रांचे संशोधन करण्याची जबाबदारीही या संस्थांकडे सोपवण्यात येणार आहे. या संस्थांद्वारे व्हीएनआयटीला वर्षभरातून किमान एक संशोधन सादर करायचे आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बैठक घेतली असून येत्या काही महिन्यात हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगाच्या विकासासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील एनआयटींच्या मदतीने हा प्रकल्प सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यासाठी व्हीएनआयटीला ‘नोडल इन्स्टिटय़ूट’चा दर्जा देण्यात येणार आहे. याबाबत लवकरच एक सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

– डॉ. प्रमोद पडोळे, संचालक, व्हीएनआयटी, नागपूर</p>