वासनसह अनेकांवर पोलिसांची मेहरनजर

चंद्रपूर जिल्ह्य़ात दारूबंदी असतानाही तेथे सर्रासपणे दारूची विक्री करण्यात येत असून चंद्रपूरला जाणाऱ्या अवैध दारूचे हब नागपुरात असल्याची माहिती आहे. या व्यवसायाची पोलिसांना कल्पना असूनही मद्य तस्करांविरुद्ध कोणतीच कारवाई करण्यात येत नाही.

वर्धा, गडचिरोलीनंतर राज्य सरकारने २१ जानेवारी २०१५ ला चंद्रपूर जिल्हा दारूबंदी घोषित केला. त्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०१५ पासून करण्यात आली. त्या निर्णयाला उच्च व सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, त्याचा कोणताही परिणाम झाला नाही आणि दारूबंदी कायम आहे. मात्र, त्यानंतरही वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्य़ात सर्रासपणे अवैध दारूविक्री करण्यात येते. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्य़ात नागपुरातून मोठय़ा प्रमाणात दारूची तस्करी करण्यात येते, तर गडचिरोलीत जाणारी दारू ही भंडारा व गोंदिया जिल्ह्य़ातून जाते.

नागपुरातील मोमिनपुरा परिसरातील मच्छी बाजारातून वासन नावाच्या व्यक्तीची दारू चंद्रपूरला मोठय़ा प्रमाणात जाते. त्याशिवाय कॉटन मार्केट परिसरातील विजय चित्रपटगृहाच्या मागे एका दारूच्या दुकानातून ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी तस्करी करण्यात येते. ही दारू वाहून नेण्याची जबाबदारी कुख्यात सुमित चिंतलवार आणि कादर नावाच्या व्यक्तींकडे आहे, तर इमामवाडा पोलीस ठाण्याच्या मागील परिसरातूनही चंद्रपूरला दारूची तस्करी होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पोलीस ठाण्यांना तस्करांची सर्व माहिती आहे. महामार्गावरील दारूबंदी असतानाच्या काळात या तस्करांचा व्यवसाय अधिकच वाढला आहे. मात्र, पोलीस अधिकारी छोटय़ा-मोठय़ा कारवाया करून वरिष्ठांना भुलथापा देतात आणि दारू तस्करीतील बडय़ा माशांना कधीच पकडत नाही. तस्करीसाठी वापरण्यात येणारी दारू मोठय़ा प्रमाणात बनावट दारू असते. त्यामुळे ते एकप्रकारे विष असून पिणाऱ्यांचा जोपर्यंत मृत्यू होणार नाही, तोपर्यंत पोलिसांना जाग येणार नाही, अशी चर्चाही आहे.

मद्य तस्करांना खपवून घेणार नाही

परिमंडळ-३ अंतर्गत शारीरिक व भूखंडविषयक गुन्हे करणाऱ्या ३० जणांविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली. तर १३ जणांविरुद्ध एमपीडीएची कारवाई करण्यात आली. शिवाय मोमिनपुऱ्यातील रात्रभर चालणारी बाजारपेठ बंद करण्यात पोलिसांना यश आले. जुगार अड्डय़ांवरही पोलिसांनी कारवाई करून त्यांना हाकलून लावले आहे. त्यामुळे मद्य तस्करांचा असा काही प्रकार असेल, तर खपवून घेतले जाणार नाही. चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३