कौटुंबिक खटल्यात उच्च न्यायालयाचा निर्वाळा

नागपूर : उच्च न्यायालयात अपील दाखल असतानाही एका पक्षकाराने दुसरा विवाह केला. याप्रकरणी पतीविरुद्ध अवमान कारवाई करण्याच्या पत्नीच्या विनंतीवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनावणी घेतली व अपील प्रलंबित असतानाही विवाह करणे, ही बाब दिवाणी अवमान प्रकरणात मोडत नसल्याचा निर्वाळा दिला.

कंगना आणि इशान (नाव बदललेली) असे घटस्फोटित दाम्पत्याचे नाव आहे. इशान हा शिक्षक असून कंगना ही गृहिणी आहे. दोघांनीही २८ डिसेंबर २००३ ला विवाह केला होता. त्यानंतर त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यांनी अकोला येथे घटस्फोटासाठी अर्ज केला. २००९ मध्ये न्यायालयाने सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर घटस्फोट मंजूर केला.

कंगनाने दिवाणी न्यायालयात प्रथम अपील केले. २०१५ मध्ये दिवाणी न्यायालयाने तिचे अपील फेटाळले. त्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दुसऱ्यांदा अपील केले.

हे अपील प्रलंबित असतानाच इशानने २० मार्च २०१६ दुसरे लग्न केले. त्यामुळे कंगनाने इशानविरुद्ध दिवाणी अवमान याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. इशानने न्यायालयात अपील प्रलंबित असताना दुसरा विवाह करणार नाही, असे हमीपत्र लिहून दिल्याचे सिद्ध होऊ शकले नाही. न्यायालयाने सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर ही बाब दिवाणी अवमान प्रकरणात मोडत नसल्याचा निर्वाळा दिला.