• लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यास मनाई
  • जात वैधता प्रमाणपत्र अद्याप दाखल नाही

जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने प्रभाक ५-अ मधून निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविका दुर्गा चंद्रभूषण हत्तीठेले यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नगरविकास सचिव, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि जात वैधता पडताळणी समितीला नोटीस बजावली आहे. तसेच हत्तीठेले यांना लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यास मनाई केली आहे.

२३ फेब्रुवारी २०१७ ला नागपूर महानगरपालिकेची निवडणूक झाली. प्रभाग ५ मधील (अ) मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राखीव होता. त्या प्रवर्गातून हत्तीठेले भाजप उमेदवार म्हणून ११ हजार मते घेऊन निवडून आल्या. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र दिले होते.

त्यानुसार सप्टेंबर महिन्यापर्यंत त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र महापालिका आयुक्तांना सादर केले नाही. त्यासंदर्भात जात वैधता पडताळणी समितीकडे माहितीच्या अधिकारात माहिती विचारली असता त्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्तावच पाठवला नसल्याची माहिती उघड झाली.

त्यासंदर्भात महापालिका आयुक्त व विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली व हत्तीठेले यांना अपात्र ठरवण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी नगरविकास सचिवांना प्रस्ताव पाठवून हत्तीठेले यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना अपात्र ठरवण्याची शिफारस केली. मात्र, नगरविकास विभागाने अद्यापही त्यावर निर्णय घेतला नसल्याने दुसऱ्या क्रमांकाचे मत प्राप्त करणाऱ्या कॉंग्रेसच्या उमेदवार प्रिती अनिल सहारे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हत्तीठेले यांना अपात्र ठरवून आपल्याला विजेता घोषित करण्याची विनंती केली. त्या याचिकेवर न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावून हत्तीठेले यांना लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यास मनाई केली. सहारे यांच्यावतीने अ‍ॅड. अश्विन इंगोले यांनी बाजू मांडली.