चित्रफित ‘व्हायरल’ झाल्याने खळबळ

मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकीकडे नागपूर पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या पाठीवर वेळोवेळी कौतुकाची थाप देत असताना त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी हे पोलिसांना अर्वाच्य शिवीगाळ करीत असल्याची चित्रफित ‘व्हायरल’ झाल्याने खळबळ उडाली आहे.

दोनच दिवसांपूर्वी रामटेकचे भाजप आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी एका महिलेला शिवीगाळ केली होती. त्याआधी आर्णीचे भाजप आमदार राजू तोडसाम यांनी एका कंत्राटदाराला लाच मागितल्याचे प्रकरण समोर आले. आता तिवारी यांची वादग्रस्त चित्रफित व्हायरल झाल्याने पक्षापुढील संकट वाढू लागली आहे.

तिवारी हे भाजपचे वरिष्ठ नगरसेवक आहेत. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. सुसंस्कृत आणि उत्कृष्ट वक्ते अशी त्यांची ख्याती आहे. मात्र, पोलिसांशी वाद घालताना त्यांचा तोल सुटला. त्यांनी महिला पोलिसांच्या सक्षमच अश्लील शिवीगाळ केली. या घटनाक्रमाची चित्रफित व्हायरल झाल्याने बिंग फुटले. चित्रफितीत पोलीस आणि तिवारी हे जोरजोराने प्रतिवाद करीत असल्याचे दिसून येते. या प्रकरणात तिवारी यांनी पोलिसांविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

मद्यधुंद पोलिसाला निलंबित करा -दयाशंकर तिवारी

रविवारी रात्री वैभव दीक्षित आणि आदित्य ठाकूर हे दोघे मोक्षधामकडून जात असताना त्यांना पोलिसांनी अडवले. वैभव हा मद्य घेऊन नव्हता आणि ते पोलिसांनी सिद्ध केल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. त्याचे डोके फुटले. या घटनेची माहिती कळल्यावर गणेशपेठ ठाण्यात पोहचलो असता पोलिसांनी उद्धटपणे वागणूक दिली. वैभवचे डोके फुटल्यावरही त्याला बसवून ठेवण्यात आल्याने पोलिसांवर संतापलो आणि संतापाच्या भरात माझ्या तोंडून ‘अपशब्द’ निघाले. किशोर जाधव नामक शिपायाने मद्य प्राशन केले होते. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही तसेच कारवाई करण्यात आली नाही. किशोर जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक कांडेकर यांना निलंबित करावे, अशी मागणी दयाशंकर तिवारी यांनी केली.

असे आहे प्रकरण

गांधीबाग प्रभागातील वैभव दीक्षित आणि आदित्य ठाकूर मोक्षधामकडून मेडिकल चौकाकडे दुचाकीने रात्री साडेअकरा वाजता जात होते. त्यावेळी त्यांना गस्तीवर असलेल्या वाहतूक पोलिसांनी थांबण्यास सांगितले. मात्र, ते थांबले नाहीत म्हणून पोलिसांनी त्यांच्या दिशेने काठी भिरकावली. त्यामुळे वैभव दीक्षित जखमी झाला. पोलिसांनी त्यांना गणेशपेठ ठाण्यात आणले. वैभवने त्याचा भाऊ व भाजप नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना फोन केला. तिवारी यांनी गणेशपेठ पोलीस ठाणे गाठले. मुलांना अशाप्रकारे मारहाण का केली आणि त्यांना ठाण्यात का बसवून ठेवले, याबाबत पोलिसांवर आगपाखड केली. यावेळी पोलीस आणि तिवारी यांच्यात बाचाबाची झाली. तिवारी यांना पोलिसांनी शिवीगाळ केली.