वारंवार होणाऱ्या संपाने संताप; शासनाकडून ‘मेस्मा’चा वापर

महापालिकेच्या ‘आपली  बस’चे  कर्मचारी वेतन वाढीच्या मागणीसाठी मंगळवारपासून संपावर गेल्याने बससेवा पूर्णपणे कोलमडली.

संपामुळे प्रवाशांचे हाल झाले. ऑटोरिक्षा चालकांनी जादा भाडे आकारून त्यांची लूट केली. शासनाने हस्तक्षेप करीत महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियमचा (मेस्मा) वापर करत संपावर प्रतिबंध लावले, परंतु आंदोलक कामावर परतणार काय? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

नागपुरात महापालिकेच्या ३७५  बस रोज धावतात. खासगी कंपनीच्या माध्यमातून त्याचे संचालन केले जाते. त्याकरिता तीन हजार कर्मचारी, कमगार काम करतात.  किमान वेतनही मिळत नसल्याचा आरोप करत सर्व कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वात बेमुदत संप पुकारला. पहिल्याच दिवशी शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक कोलमडली. रस्त्यांवर एकही बस नसल्याने शाळकरी विद्यार्थ्यांपासून चाकरमाने आणि सामान्य नागरिकांना प्रचंड मन:स्ताप झाला. शाळा, कार्यालय गाठण्यासाठी काहींनी ऑटोरिक्षा, ऑनलाईन टॅक्सी वा इतर वाहनांतून प्रवास केला, परंतु त्यांना जास्त पैसे खर्च करावे लागले.

ऑटोरिक्षा चालकांनी नेहमीच्या तुलनेत प्रतिप्रवासी पाच रुपये जादा भाडे घेतल्याचा आरोप आहे.  शहर बससेवा बंद असल्याची माहिती नसल्याने बाहेरगावातून एसटीने नागपुरात आलेल्या शेकडो कुटुंबांना स्वतंत्र ऑटोरिक्षा करून निश्चित स्थळ गाठावे लागले. त्यामुळे अनेकांना एसटीने अनेक किमी प्रवास करण्यासाठी लागलेल्या भाडय़ाच्या तुलनेत जास्त खर्च लागला. दरम्यान, संतप्त कामगारांनी वेतनवाढीच्या मागण्यांसाठी पटवर्धन डेपो परिसरात एकत्र येत शहर बस व्यवस्थापन आणि नागपूर महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या विरोधात निदर्शने केली, तर शासनाने सामान्यांचा त्रास बघत मेस्मा कायद्याचा वापर करत संप करण्यास प्रतिबंध घातला.  या कायद्यानुसार कामगार सेवेवर परतले नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.

कामावर वेळेवर पोहचायचे कसे?

शहर बससेवा बंद असल्याने मोमीनपुऱ्यातून मोरभवनपर्यंत ऑटोरिक्षाने आलो. येथेही बस सेवा बंद होती. त्यामुळे कार्यालयात वेळेवर पोहोचायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला. वेतनवाढीचा वाद कर्मचारी आणि बस प्रशासनाचा असून त्यात नाहक ग्राहकांना त्रास होत आहे, असे मत मोहम्मद नासीर यांनी व्यक्त केले.

५,५०० फेऱ्या प्रभावित

शहरात ३७५ आपली बसच्या मदतीने ५,५०० फेऱ्यांच्या मदतीने प्रवासी वाहतूक दिली जाते. कामगार संपामुळे एकही फेरी होऊ शकली नाही. या विषयावर कामगारांसोबत चर्चा करून त्वरित तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.

 – चंद्रप्रकाश तिवारी,व्यवस्थापक, डिम्स, नागपूर

 

कामगारांनी सेवेत रुजू होण्याचे आवाहन

बुधवारपासून सुरू होणारी बारावीची परीक्षा आणि सामान्यांचा त्रास बघता शासनाने मेस्मा लागू केला आहे. त्यानुसार कामगारांना सहा महिने आंदोलन करता येत नाही.  प्रवाशांना त्रास होऊ नये ही सर्वाची जबाबदारी आहे,  कामगारांनी त्वरित सेवेवर रूजू होऊन शांततेच्या मार्गाने चर्चा करून प्रश्न सोडवावे, असे आवाहन महापालिकेच्या परिवहन विभागाचे जगताप यांनी  केले.

खापरखेडा मार्गावर सर्वाधिक त्रास

नागपूरच्या मोरभवन बसस्थानकाहून कान्होलीबारा, भंडारा, रामटेकसह इतर भागात  एसटीच्या बसेस धावतात. त्यामुळे या मार्गावरील हिंगणा, कामठी, कोराडी, डिफेन्स, पारशिवनीपर्यंत प्रवास करणाऱ्या नागरिकांना एसटीच्या बसची मदत झाली. खापरखेडा मार्गावर प्रत्येक दोन ते अडीज तासात एक बस असल्याने या मार्गावरील नागरिकांना सर्वाधिक त्रास झाला. नापूरच्या नारा, नारी, नाक्षेलवन, यशोधरानगर, गिट्टीखदान, काटोल नारा, फेन्ड्स कॉलनी, रविनगर भागातील नागरिकांनाही शहर बससेवा बंद असल्याने ऑटोरिक्षा वा इतर वाहनाने त्यांच्या निश्चित स्थळ गाठण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागले.

बस संपामुळे विलंब

वणीहून एसटीने मोरभवन बसस्थानकावर आलो. हिंगण्याला जायचे असल्याने शहर बसची वाट बघत थांबलो, परंतु संप असल्याची माहिती नव्हती व स्थानकावरही तशी उद्घोषणा करण्यात आली नाही, त्यामुळे एक तास वाया गेला. असे मत िहगणा येथील रेवनात धुळे यांनी व्यक्त केले.

शहर बस वाहक चालकांनी पुकारलेला बंद हा बेकायदेशीर आहे. किमान वेतननुसार त्यांना वेतन दिले जात आहे.  उर्जा व उद्योग मंत्रालय यांच्याकडे वेतनासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. सध्या शिवसेनेचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडम्े हा विभाग असून त्यांच्याकडे हा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास तो लागू करण्यात येईल. सध्या २०१० च्या अधिसूचनेनुसार वेतन देण्यात येत आहे. मात्र चालक किंवा वाहक यांनी नागरिकांना वेठीस धरु नये

      – बंटी कुकडे, सभापती, परिवहन समिती , महापालिका