शहर बसचा संप मागे, प्रवाशांची गैरसोय -महापालिकेविरुद्ध संतप्त भावना

शहर बससेवा संचालन करणाऱ्या तीनही कंपन्यांची देणी महापालिकेने थकवल्याने त्यांनी सेवा देणे थांबवले आहे. त्यामुळे या कंपन्यांनी या बसने प्रवास करणाऱ्यांनाच वेठीस धरले असून त्यांची शुक्रवारी चांगलीच गैरसोय झाली.  मोरभवनमधून एकही बस सुटली नाही. दुसरीकडे  बस सेवा बंद असल्याने खासगी वाहनांची मनमानी वाढली, त्यामुळे नागरिकांनी महापालिकेवर व कंपन्यांवर संताप व्यक्त केला. दुपारनंतर परिवहन विभागाने कंपन्यांशी चर्चा केल्यानंतर संप मागे घेण्यात आला.

महापालिकेची बससेवा चालवण्याची जबाबदारी आर.के. सिटी बस, हंसा ट्रॅव्हल्स ऑफ स्मार्ट सिटी आणि ट्रायव्हल टाईम या तीन कंपन्याकडे आहे. या कंपन्यांना दर महिन्याला प्रत्येकी ५० ते ६० लाख रुपये द्यावे लागते. आर्थिक स्थिती डबघाईस आल्याने दर महिन्याला ही रक्कम देणे महापालिकेला शक्य नाही. त्यामुळे तीनही कंपन्यांना प्रत्येकी १४ कोटी रुपये महापालिकेला देणी आहे. वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने या कंपन्यांनी शेवटी आज सेवाच थांबवली. त्याचा फटका दररोज बसने प्रवास करणाऱ्या  चाकरमानी आणि विद्यार्थ्यांना बसला.

आगारामधून बसेस बाहेर न पडल्या नाही. मोरभवनमध्ये आलेल्यांना वाढीव पैसे देऊन खासगी वाहनाने गंतव्य ठिकाणी जावे लागले. कोराडी किंवा कामठी ऑटो जात नाही त्यामुळे अनेकांना त्याचा त्रास झाला. अनेक प्रवाशांना  बसेस बंद असल्याची माहिती नसल्याने त्यांना ऑटोने जावे लागले. दुपारनंतर बसेस सुरू होतील, असे सांगण्यात आले होते, त्यामुळे अनेक प्रवासी मोरभवनमध्ये बसची वाट पहात बसले. पण बसेस न आल्याने प्रवाशी संतापले.  प्रवाशांना का वेठीस धरता, असा सवाल केला.

दरम्यान, महापालिकेने कंपन्यांना दीड कोटी रुपये देऊ  केल्यामुळे शहर बसच्या (आपली बस) चाकांना तूर्तास ‘ब्रेक’ लागण्याचे टळले, परंतु अजूनही सुमारे बारा कोटींहून अधिक रक्कम महापालिकेकडे थकित असल्याने शहर बससेवेवर अजूनही टांगती तलवार आहे.

ऑटो चालकांची मनमानी

शहर बस बंद असल्याने ऑटो चालकांनी दामदुपटीने भाडे आकारले. एरव्ही बर्डी ते नंदनवनपर्यंत १५ ते २० रुपये घेतले जातात. आज मात्र २५ ते ३० रुपये घेतले जात होते. शहर बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना संपाचा चांगलाच फटका बसला.

महापालिकेने तीनही कंपन्यांचे प्रत्येकी १४ कोटी रुपये थकित आहे. दोन दिवसांपूर्वी १ कोटी रुपये दिले होते आणि आज पुन्हा प्रत्येकी तीनही कंपन्यांना दीड कोटी रुपये  देण्यात आहे. कंपन्यांनी शहर बस सुरू करावी आणि नागरिकांना वेठीस धरू नये अशी सूचना केली आहे. चर्चा केल्यानंतर सायंकाळी बससेवा सुरू करण्यात आली आहे.    -बंटी कुकडे, सभापती, परिवहन समिती

महापालिकेने गेल्या पाच चे सहा महिन्यांपासून पैसे दिले नाही, चालकांचे, वाहकांचे पगार आणि डिझेलसाठी येणारा खर्च बघता कंपनीसमोर अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे दोन दिवसाचा संप करावा लागला. परिवहन सभापतीशी चर्चा केल्यानंतर आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर संप मागे घेतला जात आहे.      -आदित्य छाजेड, हंसा ट्रॅव्हल्स ऑफ स्मार्ट सिटी

(((बसच्या प्रतीक्षेत मोरभवनमध्ये बसलेले प्रवाशी