लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी क्लृप्ती; तिसऱ्या दिवशी ९२१ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस

शहरात  पहिल्या दोन दिवसांत लसीकरणाला आरोग्य कर्मचाऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला.  हे प्रमाण जास्त दिसावे यासाठी अखेर आरोग्य विभागाने नवीन क्लृप्ती योजली. त्यानुसार प्रत्येक केंद्रावर शंभर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे लक्ष्य असताना  १२० कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले. जिल्ह्य़ात बुधवारी सर्वाधिक ९२१ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसी घेतल्या.

जिल्ह्य़ात पहिल्या दिवशी ६५.७३ टक्के लसीकरण झाले. परंतु शहरात त्यातील केवळ ५५.६७ टक्केच लसीकरण झाले. दुसऱ्या दिवशी जिल्ह्य़ात ५४.८३ टक्के लसीकरण झाले. हे प्रमाण कमी होण्याला शहरी भागात केवळ ३७.४ टक्के लसीकरण हे प्रमुख कारण होते. या दोन्ही दिवशी आरोग्य विभागाने प्रत्येक केंद्रावर १००  कर्मचाऱ्यांना बोलावले. परंतु लसीकरण कमी होत असताना यादीतील मागच्यांवर अन्याय होऊ नये, असे कारण सांगत आरोग्य विभागाने बुधवारी प्रत्येक केंद्रावर १२० जणांना  बोलावले.

जास्त कर्मचाऱ्यांना बोलावल्याने लसीकरणाचे लक्ष्यही वाढणे अपेक्षित होते. परंतु हे लक्ष्य प्रत्येक केंद्रावर १०० इतकेच दाखवले गेले.  पहिल्या दोन दिवसांच्या तुलनेत  बुधवारी  ग्रामीण व शहरातही जास्त  कर्मचाऱ्यांनी लसी घेतल्या. त्यामुळे जिल्ह्य़ातील दोन ग्रामीण भागातील केंद्रांवर शंभराहून जास्त म्हणजे एका केंद्रावर १०२, तर दुसऱ्या केंद्रावर ११४ टक्के लसीकरण झाल्याचे दाखवले गेले. शहरी भागातही पाच केंद्रांवर तब्बल ६४.८ टक्के लसीकरण नोंदवले गेले. महापालिकेच्या आरोग्य विभागासह जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनीही  १२० आरोग्य कर्मचाऱ्यांना बोलावून १०० जणांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवल्याचे मान्य केले.

२४ तासांत ९ मृत्यू; ३५३ नवीन रुग्ण

बुधवारी चाचण्या वाढून ४ हजार २३१ वर पोहचल्याने  जिल्ह्य़ात २४ तासांत ३५३ नवीन रुग्ण आढळले तर दिवसभरात ९ मृत्यू नोंदवले गेले. नवीन रुग्णांत शहरातील २६६, ग्रामीण ८३, जिल्ह्य़ाबाहेरील ४ अशा एकूण ३५३ रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय दिवसभरात शहरात ४, ग्रामीण १, जिल्ह्य़ाबाहेरील ४ असे एकूण ९ मृत्यू झाले.  दिवसभरात शहरात २४९, ग्रामीणला ६१ असे एकूण ३१० व्यक्ती करोनामुक्त झाले.

जिल्ह्य़ातील लसीकरणाची स्थिती

(२० जानेवारी २०२१)

केंद्र                             लसीकरण

मेडिकल                           ५२

मेयो                                 ८५

एम्स                                 ८६

पाचपावली                        ६४

डागा                                 ३७

एन. के.पी. साळवे         ७६

उमरेड                              ८५

सावनेर                             १०२

रामटेक                            ११४

काटोल                              ७३

कामठी                              ५८

हिंगणा                              ८९

एकूण                              ९२१