मागील तीनपैकी दोन महिने सुटीवर, प्रशासनाची कसरत
विदर्भावर सूर्य आग ओकत आहे. नागपूरच्या तापमानाने चरमसीमा गाठली आहे. दुपारी घराबाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. या सर्व बाबी विपरीत असतानाही येथील उन्हाची नागपूरकरांना सवयच झाली आहे. मात्र, पुणे येथून बदली होऊन नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकपदी रूजू झालेले योगेश देसाई यांना मात्र नागपुरी उन्हाचे चटके जाणवू लागले असल्याची पुष्टी त्यांच्या सुटी घेण्यावरून स्पष्ट होत आहे.
३१ मार्च २०१५ ला मध्यरात्री मोक्काचे पाच कुख्यात कैदी मध्यवर्ती कारागृहातून पळून गेले. महाराष्ट्रातील अतिशय सुरक्षित समजल्या जाणाऱ्या नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या कैद्यांनी सुरक्षा व्यवस्थेला सुरूंग लावल्याने संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटले. राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या भाजपप्रणीत सरकारनेही या घटनेचा प्रचंड धसका घेतला.
घटनेला काही काळ उलटताच तत्कालीन कारागृह अधीक्षक वैभव कांबळे यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर बरेच दिवस अधीक्षकपदाचा प्रभार या-त्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला होता. परंतु प्रसारमाध्यमांमध्ये आणि राज्यभरात चर्चेत असलेल्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात काम करण्यास कुणीच तयार नव्हते. शेवटी पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे दबंग अधीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या योगेश देसाई यांना नागपुरात पाठवण्यात आले. नागपूर मध्यवर्ती कारागृहाची जबाबदारी स्वीकारताच त्यांनी १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फासावर पोहोचविण्याची मोठी जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केली.
त्यानंतर देसाई यांचे संपूर्ण देशात मोठे नाव झाले. नागपूर मध्यवर्ती कारागृहात त्यांनी काही सकारात्मक बदलही केले. परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे कामात लक्ष नसल्याची चर्चा कारागृह प्रशासनात आहे. फेब्रुवारीपासून ते नियमित अंतराने सुटय़ा घेत आहेत. एप्रिल महिन्यात ते नोकरीवर रुजू झाले होते. त्यानंतर १३ एप्रिलपासून पुन्हा ते सुटीवर गेले आणि आजपर्यंत सुटीवरच आहेत. कारागृह अधीक्षकासह पूर्व विभागाचे तुरुंग उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडेच आहे. त्यांच्या नियमित कालांतराच्या सुटीमुळे कारागृह आणि तुरुंग उपमहानिरीक्षक कार्यालयातील कामावर विपरीत परिणाम पडत आहे. नागपुरी उन्हाचा चटका बसल्याने देसाई सुटीवर निघून गेले असून पाऊस सुरू झाल्यानंतरच ते कामावर परत येतील, अशी उपहासात्मक चर्चा कारागृहाच्या अधिकाऱ्यांमध्ये आहे. यासंदर्भात अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि राज्याच्या कारागृह विभागाचे प्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

मुख्यमंत्र्यांच्या शहरात नियमित उपमहानिरीक्षक कधी?
३० एप्रिल २०१५ ला नागपुरातील पूर्व विभाग तुरुंग उपमहानिरीक्षक शशिकांत शिंदे यांची पुणे येथे बदली करण्यात आली. त्यानंतर या पदाचा प्रभार पुणे येथील तत्कालीन उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांनी जून-२०१५ हा एक महिना नागपुरात ये-जा केली. त्यानंतर काम करण्यास असमर्थता दर्शविली आणि अधीक्षक देसाई यांच्याकडे प्रभार सोपवून निघून गेल्या. तेव्हापासून देसाई यांच्याकडेच प्रभार आहे. विदर्भातील बारा कारागृहांमध्ये जवळपास ६ हजार कैदी आहेत. त्यांचे दररोज शेकडो अर्ज उपमहानिरीक्षकांना येतात. काहींवर ताबडतोब निर्णय घेण्याची आवश्यकता असते. मात्र, नियमित आणि प्रभारी उपमहानिरीक्षक नागपुरात नसल्याने कैद्यांना वेठीस धरण्यात येत असल्याची भावना रुजत आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातच अशी परिस्थिती असणार तर काय बोलावे, अशी प्रतिक्रिया कारागृह प्रशासनात उमटत आहे.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
bjp leader ganesh naik campaign for his son sanjeev naik
गणेश नाईकांची पुत्र संजीव नाईकांसाठी मिरा-भाईंदर मध्ये मोर्चे बांधणी, जुन्या समर्थकांना सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

औरंगाबादच्या फेऱ्या
कारागृहाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी वरिष्ठ तुरुंगाधिकारी निघोट यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, तर तुरुंग उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त प्रभार औरंगाबाद विभागाचे तुरुंग उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांच्याकडे देण्यात आला. नागपूरच्या तुरुंग उपमहानिरीक्षक कार्यालयाशी विदर्भातील दोन मध्यवर्ती कारागृहांसह जिल्हा आणि खुले अशा एकूण १२ कारागृहांची जबाबदारी आहे. या कारागृहातील कैद्यांचे दस्तावेज औरंगाबादला घेऊन जावे लागत आहे.