खडू-फळा हटवून झाडू, टोपले ठेवले

समाजातील गोरगरीब व वंचितांची मुलं शिकावी म्हणून दानदात्याने शाळेसाठी दिलेल्या जागेवर वंचित बालके शिक्षण घेत होती. तरीही महापालिकेने ही शाळा बंद केली. ज्या शाळेत विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जात होती, आता तेथे सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी लावण्याचे काम होत आहे. खडू फळा पुस्तकांऐवजी आता कचरा उचलणाऱ्या गाडय़ा व झाडू, टोपले ठेवण्यात आले आहे. ही बंद असलेली शाळा सुरू  करण्याच्या मागणीसाठी परिसरातील वंचित बालकांनी आज शुक्रवारी सकाळी चिपको आंदोलन करून महापालिकेचे लक्ष वेधले.

रिंगरोडवरील शताब्दी चौकातील भीमनगर परिसरात ही शाळा सध्या बंद आहे. हाकेच्या अंतरावर रहाटे टोली ही मांग गारुडी समाजाची मोठी वस्ती आहे. रोजमजुरी, भंगार गोळा करणे ही या वस्तीतील नागरिकांची उपजीविकेची साधने. पूर्वी म्हशी भादरणे आणि प्रसंगी भीक्षा मागणे ही सुद्धा कामेही ते करायचे. सामाजिक जाण असलेल्या  खुशाल ढाके या तरुणाने वस्तीत शिक्षणाचा दीप उजळण्याचे काम केले. तो स्वत:च बालकांना शिकवू लागला. आधी महापालिकेची भीमनगर शाळा सुरू होती. परंतु, ती अचानक बंद करण्यात आली.

या शाळेची इमारत आता स्वच्छतेचे साहित्य ठेवणे आदी कामांसाठी वापरण्यात येत आहे. शाळा बंद झाल्यामुळे येथील बालकांच्या शिक्षणाचे दोरच कापले गेले. वर्दळीचा रस्ता ओलांडून आपल्या बालकांना लांबच्या शाळेत कसे पाठवायचे या भीतीमुळे अनेक निरक्षर आईवडिलांनी मुलांना शाळेतच पाठवले नाही. ही शाळा सुरू झाली, तर दिवस बदलतील. मुलं शिकू लागतील, या हेतूने वस्तीतील बालकांनीच शुक्रवारी लक्षवेधी आंदोलन केले. यापूर्वी लाल शाळा, गीतांजली टॉकीज, लोधीपुरा व सोमलवाडा, वर्धा रोड येथील बंद झालेल्या शाळा सुरू करण्यासाठी आंदोलन व मोहल्ला सभेचे आयोजन करण्यात आले होते. आंदोलनावेळी सरकारी शाळा बचाव संयुक्त कृती समितीचे संयोजक दीपक साने, खुशाल ढोक, धीरज भीसीकर, दीनानाथ वाघमारे, लक्ष्मण पोटे, देवेन्द्र परिहार आदी उपस्थित होते.

महापालिकेकडून ५१ शाळा बंद

२५ वर्षांपूर्वी शहराची लोकसंख्या १५ लाख असताना महापालिकेच्या शाळेत १.४० लाख मुले-मुली शिकत होती. यातील शिक्षकांची संख्या ४ हजार होती. आज शहराची लोकसंख्या ५० लाखाने वाढली असताना २०१८-१९ या सत्रात विद्यार्थी संख्या १६,८९२ एवढी राहिली राहिली आहे. शाळांच्या दुरवस्थेमुळे १९९ शाळा नियमित सुरू असताना पटसंख्या कमी असल्याच्या नावावर ५१ शाळा महापालिकेकडून बंद करण्यात आल्या.