शहरातील तपासणी केंद्रांवर प्रचंड गर्दी

नागपूर : शहरात करोना चाचणी केंद्रावर गर्दी वाढत आहे. परंतु त्या तुलनेत चाचणी संच उपलब्ध नसल्याने नागरिकांना मन: स्ताप सहन करावा लागत आहे.

ज्या व्यक्तीला करोनाची लक्षणे आहेत अथवा जी व्यक्ती सकारात्मक आहे तिच्या संपर्कातील लोकांची तातडीने चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. यासाठी महापालिकेने  झोननिहाय ३४  केंद्रांची व्यवस्था केली आहे. मात्र यातील अनेक चाचणी केंद्रावर पुरेशे चाचणीे संच नाहीत. त्यातच आता महापालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांना आणि तेथील कर्मचाऱ्यांना तपासणी करणे आवश्यक केल्याने ही गर्दी वाढत आहे.

चाचणी केंद्रावर सकाळी १० ते २ वाजेपर्यंत लोकांना चाचणीसाठी बोलावले जात असून एका दिवशी केवळ ५० लोकांची चाचणी केली जाते. मात्र त्यांना तासन्तास केंद्रावर बाहेर उभे ठेवले जात असून संच संपल्यावर दुसऱ्या दिवशी या असे सांगितले जाते. चाचणी केल्यावर त्याचा अहवाल दोन दिवसांनी दिला जात असल्यामुळे लोकांना करोना सकारात्मक की नकारात्मक आहे हे कळायला प्रतीक्षा करावी लागत आहे.

राजनगर येथील चाचणी केंद्रावर ज्यांना  लक्षणे नाही आणि  ज्यांच्याकडे रुग्ण नाही अशांनी चाचणी करू नये, असा फलक लावण्यात आला आहे तर दुसरीकडे प्रशासनाने  व्यापाऱ्यांना, तेथील कर्मचाऱ्यांना  चाचणी करणे आवश्यक केले आहे. महापालिकेच्या काही केंद्रावर जलद चाचणी केली जात असून त्या ठिकाणी अहवाल एक तासात देणे अपेक्षित आहे. मात्र येथेही प्रतीक्षा करावी लागत आहे. तपासणी संच नसल्यामुळे केंद्रावरील कर्मचारीही हतबल झाले आहेत.

सहा केंद्रांवर आर.टी.-पीसीआर चाचणी

शहरातील सहा  केंद्रांवर आर.टी.-पीसीआर चाचणीची व्यवस्था आहे. आर.टी.पी.सी.आर. चाचणी ज्या केंद्रांवर होते, त्या केंद्रांमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र , लॉ कॉलेज वसतिगृह, रविभवन, मॉरिस कॉलेज वसतिगृह, पाचपावली पोलीस वसाहत आणि राजनगर या केंद्रांचा समावेश आहे. याशिवाय शहरातील विविध भागातील २८ केंद्रांमध्ये  चाचणी केली जात आहे.

प्रत्येक केंद्रावर चाचणी संच उपलब्ध आहे. मात्र एका दिवशी ५० ते ७५ चाचण्याच केल्या जात असल्यामुळे अनेक लोकांना परत जावे लागत आहे. एकाच केंद्रावर लोकांनी गर्दी न करता वेगवेगळ्या भागातील केंद्रावर जाऊन तपासणी करावी.

– अमोल चौरपगार, सहायक आयुक्त.