रात्री दहानंतर तोडकाम बंद ठेवण्याची मागणी

छत्रपती चौकात अजस्र यंत्रसामुग्रीने छत्रपती उड्डाणपूल तोडण्याच्या कामामुळे पुलाशेजारच्या राहणाऱ्यांना मोठय़ा आवाजाचा व सिमेंटच्या धुळीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेकांनी तेथील धुळीमुळे श्वास घेण्यात त्रास होत आहे.

मेट्रो रेल्वेच्या कामासाठी मंगळवारी आठच्या सुमारास छत्रपती उड्डाणपूल तोडण्याच्या कामाला सुरुवात झाली. पूल तोडण्यासाठी भले मोठे कॉम्बो क्रशर, कटर मशीन, रॉक ब्रेकर, क्रेन अशा अजस्र यंत्रसामुग्रीचा वापर होत असल्याने शेजारी असणाऱ्या वस्तीमधील नागरिकांना मशीनच्या आवाजाचा सामना करावा लागत आहे. तसेच पूल तोडताना मोठय़ा प्रमाणत मलबा खाली आदळत असल्याने त्यातून सतत निघणाऱ्या सिमेंटच्या धुळीमुळे अनेकांना श्वास घेण्यात कोंडी देखील होत आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापसून तर रात्री उशिरा २ वाजेपर्यंत सतत पूल तोडण्याच्या कामामुळे शेजारी राहणाऱ्या लोकांना होत असलेल्या मोठय़ा आवाजाचा मन:स्ताप सहन करावा लागला.

गावंडे लेआऊट, डॉक्टर्स कॉलनी, विवेकानंदनगर, मॉडर्न हाऊसिंग सोसायटी, प्रगती कॉलनी या परिसरात पूल तोडण्याचा आवाज रात्री उशिरापर्यंत घुमत होता. पूल तोडण्यासाठी एकाच वेळी दोन्ही बाजूंनी अनेक पोकलेन मशीनचा उपयोग होत असल्याने तोडण्यात आलेल्या पुलातून सिमेंट, लोखंडाचा मलबा मोठय़ा प्रमाणात खाली पडत होता अन् सिमेंटचा धूर हवेत मिसळताना सर्वदूर पसरत होता. त्यामुळे परिसरात धूसर असे चित्र दिसून आले, तर अनेकांच्या घरात व परिसरात तो पसरत होता. पडण्यात आलेल्या पुलाचा मलबा खाली पडल्यानंतर कटर मशीनद्वारे लहान तुकडय़ांत तेथेच चुरा करण्याच्या प्रक्रियेमुळे शेजारच्या रस्त्यांनी जाणाऱ्यांनी चेहरे कापडाने बांधले होते. छत्रपती चौकातील असलेली अनेक दुकाने बंद करण्यात आली आहेत. तोडकाम सुरू असताना पाण्याचा फवारा मारण्यात येत असला तरी धूळ कमी होत नव्हती. अनेकांना श्वास घेण्यात कोंडी झाली. छत्रपतीनगर परिसरातील अनेक दुकानदार चेहऱ्याला मास्क लावलेले दिसून आले. सध्या पुलाचा मध्यभाग तोडण्यात येत असून तो पूर्णपणे सिमेंटचा असल्याने जास्त धूळ तेथे होत आहे, तर घराबाहेर उभ्या असलेल्या गाडय़ांवर तास दोन तासातच धुळाचा थर बसलेला दिसून आला.

रात्री दहानंतर बंद असावे तोडकाम

पूल तोडण्याच्या आवाजाचा व धुळीचा सर्वात जास्त त्रास होत आहे. सर्व रस्ते बंद केल्याने मला दुकान देखील बंद ठेवावे लागत आहे. आमचा कोणत्याच विकासकामांना विरोध नाही, मात्र येथील नागरिकांची गरसोय होणार नाही याची काळजी शासनाने घ्यायला हवी होती. तोडकाम सुरू असल्याने घरच्यांना सतत मोठा आवाज व धूळ सहन करावी लागत आहे. काल रात्री दोन वाजेपर्यंत हे तोडकाम सुरू असल्याने अनेकांना नीट झोपता आले नाही. त्यामुळे रात्री दहानंतर हे तोडकाम बंद करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.

आकाश बोरकर, प्रगती कॉलनी