• विरोधी पक्षनेतेपदासाठीही भांडणे
  • आज निरीक्षक येणार

पक्षांर्तगत गटबाजीला कंटाळून काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका गार्गी चोपरा यांनी पदाची शपथ घेण्यापूर्वीच राजीनामा दिला आहे. दुसरीकडे विरोधी पक्षनेता कोण? या मुद्दय़ावरही नेत्यांमध्ये मतभेद आहे. यावर तोडगा काढण्यासाठी निरीक्षक उद्या शनिवारी नागपुरात दाखल होणार आहेत. दरम्यान, पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविकेने राजीनामा दिल्याने काँग्रेसला जबर धक्का बसला आहे.

गार्गी प्रशांत चोपरा या पश्चिम नागपुरातील प्रभाग क्रमांक १० मधून तब्बल पावणे पाच हजार मतांनी विजयी झाल्या. या प्रभागातून काँग्रेसने चारही जागांवर विजय मिळवला आहे. त्यातील तीन महिला आहेत. दरम्यान, महापालिका निवडणुकीत दारुण पराभवानंतरही काँग्रेसमधील गटबाजी अजिबात कमी होताना दिसून येत नसून निवडणुकीत पाडापाडीचे राजकारण करणारे नेते आता विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘दंगल’ करण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या ‘सामन्या’चे पंच म्हणून माजी मंत्री आरीफ नसीम खान आणि विनायक देशमुख यांची नेमणूक केली आहे. ते पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे मत जाणून घेण्यासाठी  शनिवारी नागपुरात दाखल होत आहेत. या दोन्ही निरीक्षकांनी दिलेल्या अहवालावर प्रदेशाध्यक्ष गटनेत्याची घोषणा करणार आहेत.

प्रदेशध्याक्षांनी गटनेत्याच्या नावावर चर्चा करण्यासाठी शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि नगसेवक प्रफुल गुडधे यांना मुंबईत बोलावले होते. चव्हाण यांनी दोघांचे मत जाणून घेतले. परंतु दोन दिवस झालेल्या चर्चेअंती कुणाच्याही नावावर एकमत होऊ शकले नाही. काँग्रेसला लोकसभेत, विधानसभेत आणि महापालिकेतही जनतेने नाकारले. परंतु अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेस नेत्यांना ते विरोधी पक्षात आहेत आणि सत्ताधाऱ्यांविरुद्ध भांडायचे असते, हे अद्याप उमगले नसल्याचे दिसून येते. केंद्रात, राज्यात मंत्रीपदे भोगलेल्या या नेत्यांनी शहर कार्यकारिणीतील नावावरून वाद घातला.  महापालिका निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून सुरू झालेला हा वाद इतका वाढवला की, ते एकमेकांना शत्रू समान बघत राहिले. राज्यात आणि केंद्रात आपण सत्तेत नाही. त्यामुळे किमान महापालिकेत सत्तेसाठी प्रयत्न करावे, असेही या नेत्यांना वाटले नाही. तिकीट वापटावरून अतिशय कटवड पद्धतीवर भांडले. त्यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत उमेदवार निश्चित करता आले नाहीत. काँग्रेसचा हा वाद येथेच मिटला नाही तर एकेका प्रभागात दोनदोन ए-बी फॉर्म वाटून घोळ घालण्यात आला. काँग्रेसच्या उमेदवारांविरुद्ध बंडखोरांना रसद पुरवली. तसेच एकमेकांच्या उमेदवारांना पाडण्यात कसर ठेवली नाही. त्यानंतरही या नेत्यांची पक्षाला लयास नेण्याची हौस काही भागलेली नाही. निवडणुकीत जोरात आपटी खाल्ल्यानंतर विरोधी पक्षनेते पदावरून भांडणे सुरूच ठेवली आहेत.

तुम्हीच ठरवा..

प्रदेश काँग्रेसने राज्यातील नऊ महापालिकांमध्ये (मुंबई वगळून) गट नेत्यांची निवड करण्यासाठी बैठक बोलावली. मात्र, नाव निश्चित होऊ शकलेले नाही. त्यावर नागपूर महापालिकेतील गटनेता नवनिर्वाचित नगरसेवकांशी चर्चा करून ठरावा, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. गटनेता निवडीवर लक्ष ठेवण्यासाठी नसीम खान आणि विनायक देशमुख यांनी निरीक्षक म्हणून पाठवण्यात येणार आहे. नागपूर महापालिकेची सभा रविवारी (५ मार्चला) बोलवण्यात आली. यावेळी महापौर, उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. या सभेला जाण्यापूर्वी काँग्रेसला गटनेता निवडावा लागणार आहे.

तत्त्वासाठी राजीनामा

शहरात पक्षाची पडझड होत असताना प्रभाग क्रमांक १० मध्ये चारही जागांवर काँग्रेस जिंकली. गार्गी चोपरा  पावणेपाच हजार मतांनी विजयी झाल्या. अधिक मताधिक्याने जिंकणे हीच समस्या ठरते असे वाटते. पण आम्ही तत्त्वाशी तडजोड करणारे लोक नाहीत. यापूर्वी २००९ मध्ये राजीनामा दिला होता. एका स्वपक्षीय नगरसेवकाने राजनगर येथील जागा हडपण्याचा प्रयत्न केला होता. त्याविरोधात तो राजीनामा होता, असे नगरसेविका गार्गी चोपरा यांचे पती डॉ. प्रशांत चोपरा म्हणाले. राजीनामा महापालिका आयुक्त, महापौर आणि काँग्रेस शहराध्यक्षांकडे पाठवला, असेही ते म्हणाले.