News Flash

विरोधी नेतेपदावरूनही नागपूरमध्ये काँग्रेसमधील संघर्ष संपेना

नागपूर शहरातील काँग्रेस नेते परस्परांना पाण्यात पाहतात.

congress-party
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी वाटपावरून माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे झालेले मतभेद आणि चतुर्वेदी यांनी दिलेला इशारा याबाबत प्रदेश काँग्रेस गाफिल राहिल्याने नागपूर महापालिका विरोधीपक्ष नेतेपदाच्या कायदेशीर लढाईत चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांची नाचक्की झाली आहे.

नागपूर शहरातील काँग्रेस नेते परस्परांना पाण्यात पाहतात. हे येथील सामान्य कार्यकर्त्यांला देखील कळते. परंतु कायम सत्तेत राहिल्याने या नेत्यांमधील साठमारी बाहेर येत नव्हती.  सत्ता गमावल्यानंतर या नेत्यांनी एकत्र येण्याचे नाटक करून बघितले होते. परंतु मतलबी राजकारणातून एकजूट दाखवण्याचे प्रकरण फार दिवस चालले नाही. साध्या शहर कार्यकारिणीवरून या नेत्यांनी एकमेकांचे तोंड पाहणे बंद केले. तेथपासून सुरू झालेला वादाने तिकीट वाटपात गंभीर वळण घेतले. मुंबईतील काँग्रेस भवनाने या नेत्यांची हमरी-तुमरी बघितली. त्याचवेळी सतीश चतुर्वेदी यांनी प्रदेशाध्यक्षांना आव्हान दिले होते.  त्यानुसार ते संधीचे वाट पाहत राहिले. निवडणूक प्रचाराच्या काळात चव्हाण यांच्यावर शाई फेकण्यात आली. निवडणुकीत एकमेकांच्या उमेदवारांना पाडण्यात आले. त्याही प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. निवडणुकीत दारुण पराभव झाला आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध मोर्चे बांधणी नागपुरातून सुरू झाली. परंतु कुणाच्याही ध्यानीमनी नसताना विरोधीपक्ष नेतेपदासाठी  संजय महाकाळकर यांचे नाव पुढे आले. त्यामुळे माजी मंत्री विलास मुत्तेमवार विरोधातील आणखी एक गट दुखावला गेला. या सर्व गट चतुर्वेदी यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. मुत्तेमवार गटाविरोधात अनेकदा दिल्लीतही ठाण मांडले. मात्र प्रदेशाध्याकडून ठोस पावले उचलण्यात आली नाही. त्यांनी नागपुरातील काँग्रेस नेत्यांमध्ये सुरू असलेली बेदिली गांर्भीयाने घेतली नाही. लोकसभा निडणुकीत पराभव झाल्याने गलीतगात्र झालेल्या विलास मुत्तेमवार यांनी देखील शहरातील काँग्रेस नेत्यांचे गुप्त कारवायांना महत्व दिले नाही. अशा प्रकारे माजी मंत्र्यांना गृहित धारून गाफील राहिल्याने नागपूर महापालिकेतील विरोधीपक्ष नेतेपद बंडखोरांना मिळाले आहे.

चतुर्वेदी यांनी नगरसेवकांची १६ नगरसेवकांची मोट बांधून तानाजी वनवे यांची विरोधीपक्ष नेतपदी निवड करवून घेतली. यासाठी आपले राजकीय कौशल्य वापरून सत्ताधाऱ्यांची साथ मिळवली. पक्षाच्या नगरसेवकांना फोडून प्रदेश काँग्रेसने निवडलेल्या गटनेत्याच्या विरोधात बंड करण्यात आले. त्यामुळे संजय महाकाळकर यांनी विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले. त्यामुळे न्यायालयातील लढाई विलास मुत्तेमवार गट विरुद्ध सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत आणि अनीस अहमद अशी होती. परंतु कालांतराने प्रदेश काँग्रेसने मध्यस्थी अर्ज दाखल करून संजय महाकाळकर यांच्या बाजूने उभे राहिले होते. न्यायालयाने बहुताचा आधार घेत वनवे यांचा गटनेतेपदाची निवड योग्य ठरवली. अशाप्रकारे  चतुर्वेदी, राऊत, अहमद यांनी कायद्याच्या काठीने  अशोक चव्हाण आणि विलास मुत्तेमवार यांचा वचपा काढला.

विदर्भ आणि नागपूर हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला होता. मात्र देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री झाल्यापासून नागपूरमध्ये विकास कामे सुरु केल्याने त्याचा भाजपला फायदा झाला आहे. नागपूर लोकसभा, जिल्ह्य़ातील एक वगळता सर्व आमदार, महानरपालिका सारेच भाजपने एकहाती जिंकले. काँग्रेस कमकुवक होऊनही गटबाजी काही कमी झालेली नाही. नेते मात्र अजूनही वादातच अडकले आहेत.

प्रकरण काय आहे

प्रदेश काँग्रेसने नागपूर महापालिकेच्या गटनेतेपदी संजय महाकाळकर यांची नियुक्ती केली. पक्षातील दुसऱ्या गटाने त्याविरोधात बंड केले. नगरसेवकांना संदेश पाठवून शहरातील एका सभागृहात बैठक घेण्यात आली. त्यात तानाजी वनवे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. काँग्रेसच्या २९ पैकी १६ सदस्यांचे समर्थन असल्याने विभागीय आयुक्तांनी तानाजी वनवे यांना गटनेता म्हणून मान्यता दिली. महापालिका सभागृहाने त्यांना विरोधी पक्ष नेता म्हणून जाहीर केले. त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2017 3:30 am

Web Title: nagpur congress internal disputes ashok chavan
Next Stories
1 भूस्खलनाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी मागविला
2 सुरक्षित वीज पुरवठय़ावर महावितरणचा भर
3 नागपूर-मुंबई रेल्वेसेवा विस्कळीतच
Just Now!
X