पुन्हा ७७ मृत्यू झाल्याने भय कायमच

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ७७ करोना रुग्णांचा मृत्यू झाला तर २ हजार २२४ नवीन रुग्णांची भर पडली. पुन्हा मृत्यू वाढल्याने आरोग्य विभागात चिंता वाढली आहे  तर दुसरीकडे अनेक आठवडय़ाने जिल्ह्य़ातील सक्रिय रुग्णांची संख्या ४० हजारांहून खाली आल्याने  आंशिक दिलासाही मिळाला आहे.

सक्रिय  रुग्णांमध्ये शहरातील २० हजार १४८, ग्रामीणचे १९ हजार ४६८ अशा एकूण ३९ हजार ६१६ रुग्णांचा समावेश आहे. त्यातील गंभीर संवर्गातील ६ हजार ३८२ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये  तर ३३ हजार २३४ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत. दरम्यान, २४ तासांत शहरात ४१, ग्रामीणला २५, जिल्ह्य़ाबाहेरील ११ अशा एकूण ७७ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ५ हजार ६०, ग्रामीण २ हजार १२९, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार २१३ अशी एकूण जिल्ह्य़ात ८ हजार ४०२ रुग्णांवर पोहोचली आहे. याशिवाय दिवसभऱ्यात शहरात १ हजार १६३, ग्रामीणला १ हजार ५०, जिल्ह्य़ाबाहेरील ११ अशा एकूण २ हजार २२४ रुग्णांची भर पडली. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या ३ लाख २३ हजार १२५, ग्रामीण १ लाख ३४ हजार ८४, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ३९५ अशी एकूण जिल्ह्य़ात ४ लाख ५८ हजार ६०४ रुग्णांवर पोहोचली आहे.

विदर्भात पुन्हा दोनशेहून अधिक मृत्यू

विदर्भात १० आणि ११ मे असे दोन दिवस करोना मृत्यूची संख्या दोनशेच्या खाली गेली असतानाच १२ आणि १३ मे असे दोन दिवस मृत्यूसंख्या पुन्हा  दोनशेवर गेली आहे. २४ तासांत येथे २०८ रुग्णांचा मृत्यू तर ८ हजार ५७० नवीन रुग्णांची भर पडली. गुरूवारी नागपुरात २४ तासांत झालेल्या मृत्यूंमध्ये नागपुरातील ४१, ग्रामीण २५, जिल्ह्य़ाबाहेरील ११, अशा एकूण ७७ रुग्णांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्य़ात २४ तासांत २ हजार २२४ नवीन रुग्ण आढळले. विदर्भातील एकूण मृत्यूत नागपूर जिल्ह्य़ातील ३७.०१ टक्केमृत्यूंचा समावेश आहे. भंडाऱ्यात ७ रुग्णांचा मृत्यू तर २१८ रुग्ण, अमरावतीत २४ मृत्यू तर १ हजार १८८ रुग्ण, चंद्रपूरला २७ मृत्यू तर ८३५ रुग्ण, गडचिरोलीत १२ मृत्यू तर २६६ रुग्ण, गोंदियात ६ मृत्यू तर २७२ रुग्ण, यवतमाळला ८ मृत्यू तर ६७९ रुग्ण, वाशीमला ६ मृत्यू तर ५८८ रुग्ण, अकोल्यात १४ मृत्यू तर ७५६ रुग्ण, बुलढाण्यात २ मृत्यू तर १ हजार ६० रुग्ण, वर्धा जिल्ह्य़ात २५ मृत्यू तर ४८४ नवीन रुग्ण आढळले.

करोनामुक्तांचे प्रमाण ८८.६८ टक्क्यांवर

शहरात दिवसभरात ३ हजार ८४, ग्रामीणला २ हजार ८०० असे एकूण ५ हजार ८८४ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या २ लाख ९८ हजार १७४, ग्रामीण १ लाख १२ हजार ४१२ अशी एकूण जिल्ह्य़ात ४ लाख १० हजार ५८६ व्यक्तींवर पोहोचली आहे.  करोनामुक्तांचे प्रमाण ८८.६८ टक्के आहे.

सकारात्मक अहवालाचे प्रमाण घसरले

शहरात दिवसभरात ११ हजार ९०८, ग्रामीणला ३ हजार ८०६ अशा एकूण १५ हजार ७१४  चाचण्या झाल्या. त्यांचे अहवाल शुक्रवारी अपेक्षित आहेत. परंतु बुधवारी तपासलेल्या १७ हजार १६१ नमुन्यांत २ हजार २२४ रुग्णांना करोना असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सकारात्मक अहवालाचे प्रमाण घसरून १२.९५ टक्के नोंदवले गेले.