नागपूरमधील अंबाझरी येथे मेट्रोच्या कामासाठी आणलेल्या क्रेनच्या धडकेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. क्रेन रिव्हर्स घेत असताना दुचाकीला धडकल्याचे समजते.

अंबाझरी मार्गावर एनआयटी तरण तलावाजवळील टी पॉईंट येथे मंगळवारी सकाळी क्रेनने दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरुन तीन महाविद्यालयीन तरुणी जात होत्या. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिन्ही मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रिव्हर्स घेत असताना हा अपघात झाल्याचे समजते. श्रृती बनवारी, स्नेहा अंबाडकर आणि रुचिका बोरकर अशी या तरुणींची नावे असून त्या तिघीही रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी होत्या.

नागपूर मेट्रोने या अपघातावर स्पष्टीकरण दिले आहे. दुचाकीवरुन तीन तरुणी जात होत्या आणि त्यांची दुचाकी भरधाव वेगात होती. क्रेनला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला असून क्रेनला ओव्हरटेक करण्यापूर्वी त्यांनी एका रिक्षेलाही ओव्हरटेक केले होते, असे मेट्रोने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.