• व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा कारणीभूत
  • तीन दिवसांपासून तापाने आजारी

शहरातील बहुचर्चित श्रद्धानंद अनाथालय तीन महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूने पुन्हा एकदा चर्चेत आहे. खुशी असे चिमुकलीचे नाव असून तीन दिवसांपासून ती तापाने फणफणत होती. परंतु अनाथालय प्रशासनाने तिला डॉक्टरांना न दाखविता अनाथालयाच ठेवले आणि शेवटी मृत्यू झाल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) घेऊन गेले. मुलीला तपासताच डॉक्टरांनी मृत घोषित केले.

खुशीची आई मनोरुग्ण आहे. ती रस्त्यांवरून फिरत होती. तिला पकडून मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यावेळी ती गर्भवती होती. उपचारादरम्यान ती बाळंत झाली. त्यामुळे मनोरुग्णालय प्रशासनाने चिमुकल्या मुलीला १४ जून २०१६ ला श्रद्धानंद अनाथालयाकडे दिले. या ठिकाणी चिमुकलीचे संगोपन व्यवस्थितपणे होणे आवश्यक होते. परंतु प्रशासनाने चिमुकलीकडे दुर्लक्ष केले. गेल्या तीन दिवसांपासून ती तापाने फणफणत होती. मात्र, व्यवस्थापनाने तिला डॉक्टरांना दाखविले नाही किंवा तिच्यावर साधा उपचार केला नाही. गुरुवारी तिचा मृत्यू झाला. त्यामुळे व्यवस्थापनाची तारांबळ उडाली आणि व्यवस्थापनाने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून मेडिकलमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु मेडिकलच्या डॉक्टरांनी बाळ मरण पावले असल्याचे दारातच सांगितले. त्यानंतर मेडिकलमधील पोलीस चौकीला घटनेची माहिती देण्यात आली. चौकातील पोलिसांनी राणाप्रतानगर पोलिसांना कळविले. या प्रकरणात राणाप्रतापनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

तीन महिन्यांपूर्वी मुलीची आत्महत्या

श्रद्धानंद अनाथालयातील नेहा रमेश कठाळे हिला १ एप्रिल २०१६ ला अनाथालय सोडून जाण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यामुळे त्या मुलीने अनाथालयातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणानेही अनाथालय चर्चेत होते. त्यानंतर आता पुन्हा तीन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. मात्र, प्रशासनाविरुद्ध पोलीस अजिबात कारवाई करीत नसल्याने संशयाची पाल चुकचुकत आहे.

या संदर्भात श्रद्धानंद अनाथालयाच्या व्यवस्थापिका प्रतिमा दिवान यांच्याशी संपर्क केला असता आजारपणामुळे चिमुकल्या बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

नेहा कठाळेची आत्महत्या आणि आता खुशी नावाच्या चिमुकलीच्या मृत्यूसाठी श्रद्धानंद अनाथालयाचे व्यवस्थापन कारणीभूत आहे. आजारी चिमुकलीला व्यवस्थापनाने प्रथम रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही आणि चिमुकलीचा मृत्यू झाला. त्यामुळे संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाविरुद्ध निष्काळजीपणामुळे मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरण्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यासाठी पोलीस आयुक्तांना निवेदन देणार असून पर्यायी आंदोलन करण्यात येईल.

– नूतन रेवतकर,  माजी महिला अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शहर)