वाडी दुहेरी हत्याकांड; आरोपी व्हॉट्स अ‍ॅपद्वारे संपर्कात होते

नागपूर : वाडी दुहेरी हत्याकांडातील वृद्ध दाम्पत्याचा खून करण्यापूर्वी त्यांची दत्तक मुलगी व तिचा प्रियकर हे व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. व्हॉट्स अ‍ॅपद्वारे त्यांनी दिवसभरात १५० वेळा एकमेकांशी संवाद साधल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. खुनानंतर त्यांनी व्हॉट्स अ‍ॅप कॉलची माहिती मिटवली होती, अशी माहिती पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

रविवारी दुपारी वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकर अतुलचंद्र चंपाती (७२) आणि सीमा शंकर चंपाती (६४) रा. सुरक्षानगर यांचा खून करण्यात आला.  पोलिसांनी प्रकरणाचा चहुअंगाने तपास केला असता चंपाती दाम्पत्याचा कुणाशीही वाद नव्हता. पण, अभियंता असलेली दत्तक मुलगी ऐश्वर्यामुळे ते तणावात होते. तिचे वडधामना येथील क्रिकेटपटू मोहम्मद इकलाख मुस्ताक अहमद (२३) याच्याशी संबंध होते व त्यांच्या प्रेमाला या दाम्पत्याचा विरोध होता. त्यामुळे ते तिला वारंवार टाकून बोलत होते. यातून दररोज त्यांच्या घरी भांडण व्हायचे, असे लक्षात आले. यातूनच आरोपी मुलीने जानेवारी २०१९ पासून आईवडिलांच्या खुनाची योजना आखली. रविवारी दुपारी तिने खरबूजमधून आईवडिलांना गुंगीचे औषध दिले. त्यानंतर इकलाखला घरी बोलावले. घरात एक कुत्रा असल्याने तो भुंकू नये म्हणून ती प्रवेशद्वारावर कुत्रा सांभाळत होती. तो घरात शिरताच कोयत्याने व हातोडय़ाने इकलाखने त्यांचा खून केला. पोलिसांनी ऐश्वर्याचा मोबाईल तपासला असता त्यातील अनेक संवाद नष्ट करण्यात आल्याचे दिसले. तिची कसून चौकशी तसेच सायबर सेलच्या मदतीने माहिती गोळा केली असता तिने इकलाखला दिवसभरात व्हॉट्स अ‍ॅपद्वारा ६० वेळा, इखलाखने ९० वेळा कॉल केल्याचे दिसले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन वेगवेगळी चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली, अशी माहिती भरणे यांनी दिली. यावेळी पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक, संतोष खांडेकर, उमेश बेसरकर आणि नरेंद्र हिवरे उपस्थित होते.

इकलाखने आणले गुंगीचे औषध

पहिल्या प्रयत्नात वृद्ध दाम्पत्य पुरेसे बेशुद्ध झाले नाही. त्यामुळे इकलाखने परिसरातील एका डॉक्टरशी संपर्क साधून आपल्याला झोप येत नाही. झोपेच्या गोळ्यांची मात्रा वाढवून देण्याची विनंती केली. त्यांनी औषधांची मात्रा वाढवून दिल्यानंतर त्याने औषधाच्या दुकानातून ते विकत घेतले व ऐश्वर्याला दिले.

दागिनेही पळवले

आपल्यावर पोलिसांचा संशय येऊ नये म्हणून ऐश्वर्याने तीन दिवसांपूर्वी आपले फेसबुक व जी-मेल अकाऊंट बंद केले. तिने कंपनीकडूनही ते खाते बंद करायला लावले. इकलाखनेही आपले फेसबुक खाते बंद केले. त्यानंतर चोरी करण्याच्या उद्देशाने हे हत्याकांड घडले, असे पोलिसांना वाटावे म्हणून त्यांच्या घरातून १ लाख ३ हजार ३८० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.

आठ दिवसांपूर्वीही खुनाचा प्रयत्न

आठ दिवसांपूर्वीही आरोपींनी त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता. ऐश्वर्याने अशाचप्रकारे आईवडिलांना कलिंगडमधून गुंगीचे औषध दिले होते. पण, त्यावेळी त्यांना गाढ  झोप आली नव्हती. त्यामुळे ती योजना फसली होती. एक दिवस इकलाखने तिच्या वडिलांना दुचाकीवरून ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळीही ते बचावले व त्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. तेव्हा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.