नागपूरचा राज्यात प्रथम क्रमांक; अल्पवयीन मुलांची संख्याही चिंताजनक
हरवलेल्या, पळवून नेलेल्या किंवा काही कारणास्तव घरातून निघून गेलेल्या अशा १२१९ व्यक्तींना शोधून काढल्याने नागपूर गुन्हे शाखेने राज्यात ‘मुस्कान’मध्ये दुसरा तर ‘स्माईल’मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. महत्त्वाचे म्हणजे, शोधण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये अल्पवयीन मुलांची संख्याही बरीच आहे.
आर्थिक कमकुवत गट, घरात मुलांकडे होणारे दुर्लक्ष, एकल पालक, आईवडिलांमधील बेबनाव, लैंगिक अत्याचार किंवा इतर छळांमुळेही लहान मुले घरातून निघून जातात. मात्र, असेही दिसून आले आहे की, ही अल्पसंख्याक मुले आईवडिलांनी रागवल्याने, क्रिकेटर व्हायचे होते म्हणून किंवा देह व्यापारासाठीही घरातून पळून गेली किंवा पळवून तरी नेण्यात आलेली आहेत. अशा मुलांचा छडा लावण्यात नागपूर पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून ‘मुस्कान’ आणि ‘स्माईल’ या वेगवेगळ्या वेळी घेतलेल्या दोन्ही मोहिमांमध्ये त्यांचे राज्यभरात कौतुक झाले. जुलै २०१५ मध्ये ऑपरेशन मुस्कान, तर जानेवारी २०१६ मध्ये ऑपरेशन स्माईल राबवण्यात आले. जुलैमध्ये २२०० हरवलेल्या मुलांच्या तक्रारी होत्या. त्यातून ६११ व्यक्ती शोधून काढल्या. त्यापैकी १४५ अल्पवयीन होते.
जुलैमध्ये करण्यात आलेल्या कामगिरीत नागपूर दुसऱ्या, तर मुंबई प्रथम क्रमांकावर. त्यानंतर १ जानेवारी ते ३१ जानेवारीदरम्यान ऑपरेशन स्माईल अंतर्गत ६०८ व्यक्तींना हुडकून काढण्यात आले. त्यावेळी १२८० हरवलेल्यांच्या तक्रारी होत्या. शोधून काढलेल्यांपैकी १०८ अल्पवयीन होते.
याशिवाय, ४४६ मुले फुटपाथ, झोपडपट्टीत, सिग्नलवर भीक मागताना शोधून काढण्यात गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला यश आले. हे दोन्ही ऑपरेशन करताना सामाजिक सुरक्षा विभागाने विशेष प्रयत्न केल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते.
या विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनाली पाटील म्हणाल्या, गेल्या वर्षीच्या जुलैनंतरच्या जानेवारीतील दोन वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये हरवलेल्या व्यक्तींपैकी १,२१९ व्यक्तींना शोधून काढण्यात आम्हाला यश मिळाले. त्यापैकी २५३ अल्पवयीन मुले आहेत.
ही मुले कधी घरातून निघून जातात, कधी त्यांचे खंडणीसाठी अपहरण केले जाते, तर कधी ती हरवतात. अशा मुलांच्या तक्रारी त्या त्या पोलीस ठाण्यांतर्गत नोंदवल्या जातात. त्यांच्याकडून गुन्हे शाखेकडे प्रकरणे आल्यावर त्यांची शोध मोहीम उघडण्यात येते. त्यानुसार या दोन्ही ऑपरेशनमध्ये पोलिसांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच या व्यक्तीं मोठय़ा प्रमाणात शोधून काढण्यात यश मिळाले.
बहुतांश मुलांना त्यांच्या पालकांकडे पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. त्याच्यात काही अंशी यश येते. अनाथ मुले बरीच वर्षे अनाथालयात असल्याने ती नंतर शरीराने मोठी झालेली असतात. त्यामुळे त्यांना त्यांचे पालक ओळखतील की नाही, याबाबत शंका असते, असे एका कार्यकर्त्यांने नाव न सांगण्याच्या अटीवर या वेळी बोलताना सांगितले.

मोठय़ा प्रमाणवर मानवी तस्करी
हरवलेल्या व्यक्तींपैकी १२१९ व्यक्तींचा शोधून काढल्याचे नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र, त्याचवेळी नागपूरमध्ये फार मोठय़ा संख्येने नागरिक हरवतात, त्यांना पळवून नेले जाते, अपहरण करण्यात येते, हे प्रकार गंभीर होत आहेत. कारण, जुलै २०१५ मध्ये विविध पोलीस ठाण्यात २२००, तर जानेवारी २०१६ मध्ये १२८० तक्रारी होत्या. एकूण तक्रारींची संख्या ३४८० असल्याने ‘ह्य़ुमन ट्रॅफिकिंग’ मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे उपलब्ध तक्रारींवरून लक्षात येते.