|| मंगेश राऊत

कमजोर तपासामुळे न्यायालयातून  निर्दोष सुटण्याची क्लृप्ती

नागपूर : उपराजधानीतील कुख्यात गुन्हेगार गुन्हा करण्यासाठी व आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी शहरापेक्षा नागपूरच्या ग्रामीण भागाचा अधिक वापर करू लागले आहेत. ग्रामीण पोलिसांचा तपास अनेकदा कमजोर असतो. त्यामुळे न्यायालयातून आपण निर्दोष सुटू शकतो, असा यामागे गुन्हेगारांचा तर्क असतो.

राहुल  लांबट (२७) रा. भांडेवाडी, निशांत  शाहकर (२३) रा. शक्तीमातानगर, खरबी रोड आणि जागेश्वर ऊर्फ बाळू  दुधनकर (३३) रा. निलेमलनगर, नरसाळा यांनी  कुणाल  चरडे (२९) आणि सुशील  बावणे (२४) दोन्ही रा. दिघोरी या आपल्या प्रतिस्पध्र्यांचा रविवारी कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून केला. आरोपींनी  त्यांना शहरात न संपवता जाणीवपूर्वक ग्रामीण भागात  नेले.

गेल्या दीड वर्षांपासून उपराजधानीतील गुन्हेगार ग्रामीण भागात जाऊन गुन्हे करीत आहेत. मे २०१९ मध्ये लिटिल सरदार व त्याच्या साथीदारांनी कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात बॉबी माकनचा खून केला. पण, त्या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा जरीपटका पोलीस ठाण्यात दाखल असल्याने आरोपींची योजना फसली. राजू नारंग या व्यापाऱ्याचेही अपहरण करून  खून करण्यात आला व मृतदेह कन्हान नदीच्या पात्रात फेकण्यात आला. कुख्यात अंमली पदार्थ तस्कर अफसर अंडाचा मुलगा अशरफ शेख यानेही त्याची प्रेयसी खुशी परिहारचा केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून केला. वर्षभरापूर्वी खून झालेल्या विजय मोहोडनेही आपल्या पत्नीच्या प्रियकराचे अपहरण करून कन्हान नदीच्या परिसरात त्यांला संपवले. खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानकापूर निवासी महिलेचा खून करून जाळण्यात आले होते. काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत टेका नाका परिसरातील रहिवासी असलेल्या इसमाचा खून करण्यात आला होता. तहसीलमधील लॉटरी व्यापाऱ्याचेही अपहरण करून बुटीबोरीच्या हद्दीत जाळण्यात आले होते.

या सर्व घटनांमधील मारकेरी किंवा मृत यांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी राहिली आहे. शहराच्या हद्दीतून अपहरण करून नागपूर ग्रामीणच्या हद्दीत ठार मारण्यामागे गुन्हेगारांचा एक वेगळा तर्क आहे.

गुन्हेगारांना वाटते की, ग्रामीण भागातील पोलीस सखोल तपास करीत नाही व कबुली जबाबात दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवतात. कालांतराने याचा लाभ न्यायालयात होतो व आरोपी निर्दोष सुटतात. पण, आता परिस्थिती बदलली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला हे आयपीएस होण्यापूर्वी  न्यायाधीश होते. त्यामुळे न्यायालयात टिकतील असे दस्तावेज तपासण्याचा त्यांना अनुभव आहे. प्रत्येक मोठ्या घटनेतील दस्तावेज त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होतात. त्यामुळे गुन्हेगारांनी ग्रामीणमध्ये खून केल्यास आपण न्यायालयातून निर्दोष सुटू, असा विचारच सोडून द्यावा, अशी प्रतिक्रिया ओला यांनी दिली.