News Flash

नोकराने शिवीगाळ करणाऱ्या मालकाच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड, नागपुरातील धक्कादायक घटना

शिवीगाळ करणाऱ्या मालकाची नोकराकडून लोखंडी रॉडने वार करुन हत्या

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूरमध्ये क्षुल्लक कारणावरुन वारंवार शिवीगाळ करणाऱ्या ढाबा मालकाचा नोकरानेच डोक्यावर सळीने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिंगरोड परिसरात घडली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण सातपुते (वय ४२) रा. महाजनवाडी, वानाडोंगरी असे मृत ढाबामालकाचे नाव आहे. तर, याप्रकरणी तर निखिल धाबर्डे (वय २९, रा. हिंगणा) असे अटक केलेल्या आरोपी नोकराचे नाव आहे. प्रवीण यांच्या मोहगाव झिल्पी मार्गावर रिंगरोडच्या कडेला असलेल्या ‘तंदुरी ढाबा अँण्ड रेस्टॉरंट’मध्ये निखील कामाला होता. ढाब्यावर जास्त ग्राहक नसायचे, त्यामुळे स्वयंपाकाचे काम प्रवीण स्वतः करायचे. तर निखील हा ग्राहकांना जेवण वाढण्याचं काम करायचा. दरम्यान छोट्या छोट्या कारणांवरुन प्रवीण निखीलवर नेहमी रागवायचे आणि शिवीगाळ करायचे. दररोज शिवीगाळ करण्याच्या प्रवीणच्या सवयीला निखील वैतागला होता. ढाबा बंद झाल्यानंतर प्रवीण रात्री ढाब्याच्या ठिकाणीच मद्य प्राशन करुन झोपायचा. आरोपीही रात्री तिथेच थांबायचा.

शुक्रवारी रात्री १२ ते १ दरम्यान प्रवीण आणि आरोपीमध्ये असाच वाद झाला. यातून प्रवीणने त्याला आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली. याचा राग मनात धरत प्रवीण खुर्चीवर बसलेला असताना आरोपीने पाठीमागून लोखंडी रॉडने वार केले. यात रक्तबंबाळ झाल्याने प्रवीण खाली कोसळला, तर आरोपीने पळ काढला. सकाळी एक शेतकरी परिसरात गेला असता त्याला ढाबा मालक रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडलेला दिसला. त्यांनी तातडीने हिंगणा पोलिसांना माहिती दिली. हिंगणा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन शोध घेऊन आरोपीला काही तासांतच अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 3:11 pm

Web Title: nagpur crime dhaba owner killed by staff member in hingna sas 89
Next Stories
1 बॉयलर स्फोटात पाच जणांचा मृत्यू
2 एसटीसाठी शासनाकडे दोन हजार कोटींची मागणी
3 ‘जीपीएस’ लावलेल्या आफ्रिकेतील पक्ष्याचा महाराष्ट्रात मृत्यू
Just Now!
X