गंगाजमुना परिसरातील घटना

प्रेयसीकडे एकटक बघितल्याने कुख्यात गुंडाने वाद घालून एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री २.३० च्या सुमारास लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगाजमुना सिमेंट रोडवर घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

विजय बहादुर यादव (२४) रा. नारी रोड असे मृताचे नाव आहे. तर सागर शिवलाल यादव (२२) रा. शांतीनगर असे आरोपीचे नाव आहे. सागरविरुद्ध यापूर्वीचे सात गंभीर गुन्हे दाखल असून दोन महिन्यांपूर्वी त्याला परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी तडीपार केले होते. त्यानंतर तो शहरात दाखल झाला व बुधवारी मध्यरात्री गंगाजमुना सिमेंट रोड येथे राहणाऱ्या  प्रेयसीला भेटण्यासाठी गेला. रात्री २.३० च्या सुमारास रस्त्यावर तिच्याशी बोलत असताना विजय हा तेथून जात होता. दोघांना बघून तो तेथे थांबला व आरोपीच्या प्रेयसीकडे देहविक्रय करणारी महिला असल्याचा समज करून एकटक पाहू लागला. त्यामुळे सागरने त्याला हटकले असता दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी सागरने चाकूने विजयच्या पोटरीवर वार केला. अधिक रक्तस्त्राव झाल्याने तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर सागर व त्याची प्रेयसी तेथून निघून गेले. त्यादरम्यान एक वाहनचालक तेथून जात असताना त्याला रक्तबंबाळ अवस्थेत एक व्यक्ती पडलेली दिसली. त्याने ताबडतोब पोलिसांना माहिती दिली.

लकडगंज पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. विजय हा मूळचा उत्तरप्रदेशातील जौनपूरचा राहणारा आहे. मात्र, त्याचा भाऊ नागपुरात नारी मार्गावर राहात असून चार महिन्यांपासून तो त्याच्याकडे रहायला आला होता. ट्रकचालक असल्याने बहुतांश वेळी तो घराबाहेर असायचा. दोन महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला असून पत्नी त्याच्या मूळ गावी राहते.

आरोपी असा पकडला

मध्यरात्रीच्या सुमारास सागरला कुणीच बघितले नव्हते. पोलिसांनी घटनास्थळ गाठून विजयला मेयो रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरनी तपासून मृत घोषित केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर यांनी परिसरातील स्मार्ट सिटीचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यात सागर दिसला. पोलिसांना आरोपीची पाश्र्वभूमी माहिती असल्याने ताबडतोब त्याच्या घरी पोहोचले व अटक केली. मात्र, तडीपार आरोपी शहरात दाखत होऊन खून करीत असल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.