नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच जणांच्या हत्याकांडाची घटना ताजी असतानाच मंगळवारी गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत जगदीशनगर परिसरात पुन्हा एका तरुणीची हत्या झाल्याची घटना  उघडकीस आली. शबनम शहजाद खान (२३) रा. दशरथनगर, चौबे कटिया भंडार समोर असे मृत तरुणीचे नाव आहे.

सोनू ऊर्फ तौसिफ शेख नावाच्या तरुणाचा पोलीस शोध घेत असून त्यानेच खून केला असावा, असा संशय आहे. मृत मुलीचे वडील रिक्षा चालवतात. त्यांना चार मुली असून शबनम ही सर्वात मोठी होती. मुली लहान असताना त्यांची आई पतीला सोडून गेली. तेव्हापासून त्या वडिलांसोबत आहेत. मात्र, दोन-तीन वर्षांपासून तिच्या वडिलांनी दुसऱ्या महिलेला पत्नी म्हणून घरी आणले. त्यामुळे शबनमसह इतर मुलींच्या संगोपनाकडे वडिलांचे दुर्लक्ष झाले. शाळा सोडून शबनम ही काम करू लागली. ती गोरेवाडा मार्गावरील डॉ. अमर सोबनी यांच्या खंडेलवाल सदन इमारतीमध्ये डेंटल केअर रुग्णालयात सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत ती काम करीत होती. यातून ती आपल्यासह आपल्या बहिणींसाठी खर्च करायची. सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ती आपल्या लहान बहिणीसह भाजी घेण्यासाठी बाजारात गेली होती. त्यावेळी सोनूने तिच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून भेटायला बोलावले. त्यावेळी तिने घरी गेल्यानंतर स्वयंपाक करून येत असल्याचे सांगितले. ती बहिणीसह घरी परतली व स्वयंपाक करून रुग्णालयात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. रात्री ११.३० वाजले तरी ती परतली नाही. त्यामुळे तिचे वडील व बहिणींनी  चौकशी केली. परंतु अनेकदा ती न सांगता घराबाहेर राहात असल्याची बाब तिच्या वडिलांना माहीत होती. त्यामुळे त्यांनी चोवीस तासानंतर पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, मंगळवारी दुपारी १२.३० वाजता जगदीशनगर परिसरात दाभा मार्गालगतच्या वस्तीत एका भंगार गोदामाच्या परिसरात एका तरुणीचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती गिट्टीखदान पोलिसांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकमल वाघमारे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी दोन घरांच्या भिंतीमध्ये असणाऱ्या जागेत तिचा मृतदेह चिखलाने माखलेला होता. तसेच गळ्यावर दोरीचा व्रण असून पोटात मोठी जखम असल्याने आतडे बाहेर निघाले होते. पोलिसांनी तिची ओळख पटवण्यासाठी पाण्याने चेहरा धुवून काढला. त्यावेळी मुलीचा चेहरा परिचयाचा दिसला. तिच्या आईवडिलांना संपर्क साधून मुलगी त्यांचीच असल्याची खात्री करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

प्रेमाच्या त्रिकोणातून खून

सोनू ऊर्फ तौसिफ शेख गफूर शेख रा. जगदीशनगर याचे आणि शबनमचे प्रेमसंबंध होते. मात्र, शबनम ही त्याच्या व्यतिरिक्त इतर मुलांसोबतही फिरत असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यामुळे त्याने तिला सोमवारी सायंकाळी भेटायला बोलावले व तिचा खून केला. तिने त्याला भेटायला जाण्यापूर्वी आपल्या लहान बहिणीला सांगितले होते. त्यामुळे आरोपीचे नाव निष्पन्न झाले असून गिट्टीखदान पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

अशी ओळख पटली

वर्षभरापूर्वी शबनमची लहान बहिणही घराबाहेर निघून गेली होती. त्यावेळी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. बहिणीच्या शोधासाठी शबनम त्यावेळी वारंवार पोलीस ठाण्यात यायची व कर्मचाऱ्यांना विचारणा करीत होती. त्यामुळे तिचा चेहरा काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या आठवणीत होता. तसेच ती गिट्टीखदान चौकाच्या शेजारी असलेल्या दशरथनगर परिसरात राहात असल्याची माहिती होती. त्या आधारावर तिच्या आईवडिलांना शोधण्यात आले. मृतदेहाजवळून एक मोबाईलही सापडला आहे.