अटक टाळण्यासाठी एका कुख्यात गुंडाने दिवसाढवळ्या पोलिसांवर गोळीबार केला. ही घटना शनिवारी शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालगंज परिसरातील राऊत चौकात सकाळी ११ वाजता घडली. नितेश देवराव चौधरी (२७) रा.तेलीपुरा, पेवठा असे गोळीबार करणाऱ्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली.

नितेश याची गुन्हेगारी पाश्र्वभूमी आहे. शनिवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास तो एमएच-३१, एएच-९६७२ क्रमांकाच्या कारने  लालगंज परिसरात पोहोचला. तेथून तो राऊत चौकात गेला. एका कारचालकाकडे पिस्तूल असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय कडू, राजेश घोंगडे, मनोज सोमकुंवर, युवराज कावळे आदींसह तेथे पोहोचले. नितेश हा कारजवळ उभा होता. पोलिसांना बघताच तो पळायला लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. त्यावेळी त्याने पोलिसांना पिस्तूल दाखवली व ‘माझ्या मागे याल तर खबरदार’, अशी धमकी देत त्याने पिस्तुलातून गोळी झाडली. सुदैवाने गोळी कोणाला लागली नाही. गोळीबार केल्यानंतर नितेश हा निखिल मोबाईल शॉपीजवळील गल्लीत शिरला. पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी मोठय़ा शिताफीने त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान, या घटनेची माहिती संपूर्ण शहरात पसरली. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस आयुक्त डॉ. अश्विनी पाटील, लकडगंज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर, पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे, तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. गोळीबार प्रकरणी  पोलिसांनी नितेश याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला व शस्त्र बाळगण्याचा गुन्हा दाखल करून अटक केली.

१७ गुन्हे, खंडणीही मागितली

नितेश हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध, चोरी घरफोडी, लुटपाट, दरोडय़ासह तब्बल १७ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध तडीपारचीही कारवाई करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध तहसील, लकडगंज, पाचपावली धंतोली व सीताबर्डी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असून  एकटय़ा तहसील  पोलीस ठाण्यात ११ गुन्हे दाखल आहेत. गोळीबार करण्यापूर्वी त्याने राऊत चौकातील सुबोध मेडिकोजमध्ये गेला. तेथे प्रेम भोलाजी निमजे (२६) रा. तांडापेठ हा होता. त्याला पैशाची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी त्याने जवळील पिस्तूल काढून प्रेमला धाक दाखवला. मालक श्रीकांत मुडे नसल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी नितेश याच्याविरुद्ध पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणीचा गुन्हा दाखल केला.