लग्नाच्या पूर्वसंध्येला नवरदेवाची आत्महत्या

राजेशचा शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता विवाह होणार होता. घरात आनंदाचे वातावरण होते. घरभर पाहुणे आणि धावपळ सुरू होती. घरापुढे मंडपही टाकण्यात आला होता. नवरदेव म्हणून तो याच मंडपातून बाहेर पडणार होता. कदाचित नियतीच्या मनात काही वेगळेच असेल. विवाहाच्या एकदिवसा आधी राजेश घरून निघून गेला व त्याने आत्महत्या केली. आज त्याचा मृतदेहच घरी आला आणि विवाह मंडपातून त्याची अंत्ययात्रा निघाली.

राजेश रामदास सायरे (२९) रा. नवनीतनगर, दुर्गा चौक, वाडी हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. बी.एससी.पर्यंत शिक्षण घेतल्यावर त्याने पोलीस दलात प्रवेश घेतला. पाच वर्षांपूर्वी तो नागपूर ग्रामीण पोलीस दलात नियुक्त झाला. सध्या तो काटोल पोलीस ठाण्यात कार्यरत होता. नोकरीवर लागल्याने आई वडिलांनी त्याचा विवाहाचा बेत आखला. वर्धा जिल्ह्य़ात एक ठिकाणी अनुरूप स्थळ मिळाले. मुलगीही शिक्षित (बी. एससी.) होती. विवाहानंतर या दोघांचा जोडा ‘लक्ष्मी-नारायणा’ सारखा शोभून दिसेल, अशी चर्चाही सुरू झाली. डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडाही झाला. लग्नाच्या निमित्ताने दोन्ही परिवारांनी तयारी सुरू केली. लग्नाचा मुहूर्त ठरला. २४ मार्चला सकाळी ११.३० वाजता वर्धा जिल्ह्य़ातील नवरीच्या गावातील एका सभागृहात विवाह पार पडणार होता.

नातेवाईक, मित्र परिवारांमध्ये लग्नाचे निमंत्रण गेले. लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपले. अशात लग्नाच्या एक दिवसांपूर्वी राजेश दहा मिनिटांमध्ये परत येतो, असे म्हणून दुचाकीने घराबाहेर पडला. मात्र, एक दिवस उलटूनही तो घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. काल, गुरुवारी संध्याकाळी हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहगांव झिल्पी तलाव परिसरात त्याची दुचाकी सापडली. तेव्हाच सर्वाच्या काळजाचा ठोका चुकला होता. राजेशबाबत मात्र अनिश्चितता होती. तो सुखरूप परत यावा म्हणून कुटुंबीयांनी रात्रभर देव पाण्यात ठेवले. मात्र, शुक्रवारी सकाळी नको तेच झाले. राजेशचा मृतदेह सापडला. संपूर्ण कुटुंबांवर आभाळ कोसळले. ज्या मंडपातून आज तो नवरदेव म्हणून बाहेर पडणार होता. त्याच मंडपातून अंत्ययात्रा निघाली. जे पाहुणे लग्नात सहभागी होणार होते, ते त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले, यापेक्षा दुर्दैव ते काय असणार, अशी हळहळ सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.

त्यामुलीचा सामना कसा करणार?

दोन दिवसांवर लग्न आल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राजेश तणावात होता. त्याची चौकशीही केली, परंतु त्याने सर्व ठिक आहे, असेच सांगितले. मात्र, लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाला आणि लग्नाच्या दिवशी त्याचा मृतदेह बघून आपल्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्याशी विवाह करून सुखी संसाराचे स्वप्न बघण्याऱ्या त्या मुलीचा सामना करण्याची हिंमत आपल्यात नाही, अशा शब्दात त्याच्या वडिलांनी दु:ख व्यक्त केले.